नांदेड लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. या लोकसभा मतदार संघात भाजप काँग्रेस आणि वंचित अशी तिरंगी लढत होत आहे. भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेसने माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्यावर डाव खेळला आहे. तर 2019 च्या निवडणूक अशोक चव्हाणांचा डाव खराब करणाऱ्या वंचितने अविनाश भोसीकरांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे नांदेडची लढत तिरंगी झाली आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण जरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात नसले तर ही निवडणूक त्यांच्याच भोवती फिरत आहे. भाजप प्रवेशानंतर ही लढत त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
प्रतापराव पाटील चिखलीकरांना भाजपची उमेदवारी
भाजपने नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. 2019 च्या निवडणुकीत चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांना धोबीपछाड दिली होती. या निवडणुकीत अशोक चव्हाणचं भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे चिखलीकरांची लढाई त्यामनाने सोपी झाली असल्याचे बोलले जात आहेत. भाजपची ताकद त्या जोडीला अशोक चव्हाणांची ताकद मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या फरकाने विजय मिळवण्याचा मानस चिखलीकरांचा आहे. मात्र चिखलीकरांबद्दल स्थानिक पातळीवर नाराजी आहे. त्यांच्या उमेदवारीला विरोधही करण्यात आला होता. त्याचा थोडाफार फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. चिखलीकरांची थेट लढत काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांच्या बरोबर होणार आहे.
काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण मैदनात
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला तसा मोठा चेहरा राहीला नाही. बरेचशे कार्यकर्ते आणि नेते अशोक चव्हाणांबरोबर भाजपमध्ये गेले. एक चव्हाण गेले त्या बदल्यात काँग्रेसने मात्र दुसऱ्या चव्हाणांना मैदानात उतरवले आहेत. माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. वसंतराव हे नायगाव विधानसभेतून आमदार झाले होते. मात्र 2019 ला त्यांना पराभव स्विकारावा लागला. आता ते लोकसभेच्या मैदानात आहेत. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले पण त्यावेळी वसंतराव चव्हाण गेले नाहीत. चव्हाणांना आपण विजयी होऊ असा विश्वास आहे. नांदेड हा काँग्रेसचा गड राहीला आहे. अशोक चव्हाण जरी भाजपमध्ये गेले असले तरी मतदार हे काँग्रेस बरोबरच राहातील असा विश्वास त्यांना आहे.
वंचितचा उमेदवारही मैदानात
वंचित बहुजन विकास आघाडीने नांदेडमधून अविनाश भोसीकर यांना मैदानात उतरवले आहे. मागिल लोकसभा निवडणुकीत वंचित एमआयएम युतीने जोरदार मुसंडी मारली होती. तेव्हा पक्षाच्या उमेदवाराला तब्बल दिड लाखा पेक्षा जास्त मतदान झाले होते. त्यामुळे अशोक चव्हाणांना पराभव स्विकाराला लागला होता. या निवडणुकीत अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आहेत. काँग्रेस तेवढी मजबूत नसल्याचा दावा वंचित कडून होत आहे. शिवाय दोन मराठा उमेदवारांमध्ये प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी चेहरा दिला आहे. त्यामुळे मुख्य लढत भाजप विरुद्ध वंचित अशीच होईल असे वंचितच्या नेत्यांना वाटते.
अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला
अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यानंतर त्यांना लगेचच राज्यसभेवर पाठवण्यात आले. आता नांदेडची जागा मोठ्या फरकाने निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांचे नाते तसे विळ्या भोपळ्याचे. पण आता जुने वैर बाजूला ठेवून चव्हाणांना चिखलीकरांच्या विजयासाठी झटावे लागणार आहे. चव्हाण प्रत्यक्ष मैदनात नसले तरी त्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
नांदेड काँग्रेसचा गड
नांदेड हा तसा काँग्रेसचा गड राहीला आहे. पुर्वी शंकरराव चव्हाण,नंतर अशोक चव्हाण आणि भास्करराव पाटील खतगावकर हे आलटून पालटून लोकसभेवर गेले आहेत. 1980 दोन अपवाद सोडता या मतदार संघावर काँग्रेसचाच झेंडा फडकला आहे. 2014 ला मोदी लाट असतानाही इथून काँग्रेसचे अशोक चव्हाण विजयी झाले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचा हा गड ढासळला. भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विजयी झाले होते. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा हा मतदार संघ. त्यांच्यानंतर अशोक चव्हाणांची पकड यावर होती. आता तेच भाजपमध्ये गेले आहे. त्यामुळे काँग्रेस हा गड कसा राखणार की नांदेड काँग्रेस मुक्त होणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल.
नादेड लोकसभेतील विधानसभा मतदार संघ
भोकर विधानसभा मतदारसंघ अशोक चव्हाण ( रिक्त )
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ बालाजी कल्याणकर शिवसेना
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ मोहनराव हंबर्डे काँग्रेस
नायगाव विधानसभा मतदारसंघ राजेश पवार भाजप
देगलूर विधानसभा मतदारसंघ जितेश अंतापूरकर काँग्रेस
मुखेड विधानसभा मतदारसंघ तुषार राठोड भाजप