महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे लागलं आहे. पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीत यंदा शरद पवार की अजित पवार बाजी मारणार याची लोक उत्सुकतेने वाट पाहत आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजय यांच्यातील ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाची पार्श्वभूमी
बारामती लोकसभा मतदारसंघावर मागील अनेक वर्ष पवारांचे वर्चस्व आहे. 1984 साली पहिल्यांदा शरद पवार या मतदारसंघातून लोकसभेत पोहोचले होते. त्यानंतर 1991 साली अजित पवारांना संधी मिळाली पण राजकीय परिस्थितीत अजित पवारांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर 2009 पर्यंत शरद पवारांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलं. 2009 साली सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकल्या देखील. तेव्हापासून सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विकास विरुद्ध भावनिक राजकारण
बारामती लोकसभा निवडणूक प्रामुख्याने विकास आणि भावनिक राजकारण या मुद्द्यांवर फिरली. पवार कुटुंबियांतील ही लढत असल्याने महायुतीतील मोठ्या नेत्यांना अजित पवारांनी प्रचारापासून दूर ठेवलं. अजित पवारांनी स्वत: या मतदासंघावर लक्ष केंद्रीय केलं होतं. तर शरद पवारांना देखील जवळपास 8 मोठ्या सभा बारामती लोकसभा मतदारसंघात घेतल्या.
अजित पवारांनी सातत्याने विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र विकासाच्या मुद्द्यावर बोलताना देखील शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे त्यांच्या निशाण्यावर होते. कुणी तुमच्याकडे येतील, भावनिक होतील, मात्र भावनिक न होता विकासाला प्राधान्य द्या, असा प्रचाराचा कल अजित पवारांचा होता.
निवडणुकीत पवार कुटुंबिय विरुद्ध अजित पवार असं चित्र दिसलं. एकीकडे अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि सख्खे पुतणे युगेंद्र पवार या अजित पवार यांच्या विरोधात प्रचारात दिसले. रोहित पवारांनी देखील प्रचारात महत्त्वाची भूमिका निभावली.
( नक्की वाचा : लातूरकरांच्या मतदानाचा पॅटर्न काय? श्रृंगारे की काळगे कुणाला मिळणार संधी? )
अजित पवार वि. शरद पवार
अजित पवारांनी बारामतीकरांना आवाहन करताना म्हटलं होतं की, आधी लेक म्हणजे मला खासदारकीला निवडून दिले. दुसऱ्यांदा वडिलांना (शरद पवार) निवडून दिले. मागील तीन टर्म लेकीला (सुप्रिया सुळे) निवडून दिले. आता सुनेकडे नेतृत्व आले की फिट्टमफाट होईल.
अजित पवारांच्या या वक्तव्यावर बोलताना शरद पवारांनी म्हटलं की, मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक आहे. म्हणजेच सूनेत्रा पवार या मूळच्या पवार नाहीत हेच शरद पवारांनी सांगितलं.
बारामती लोकसभा मतदारसंघातील आमदारांची ताकद
बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभांचा समावेश होतो. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर- हवेली, भोर, आणि खडकवासला या सहा मतदारसंघाचा यामध्ये समावेश होतो. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार येथून आहेत.
- बारामती - अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
- इंदापूर - दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- पुरंदर - संजय जगताप (काँग्रेस)
- भोर - संग्राम थोपटे (काँग्रेस)
- राहुल कुल - दौंड (भाजप)
- भीमराव तापकीर - खडकवासला (भाजप)
(नक्की वाचा : दक्षिण मध्य मुंबईत मतदानाचा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?)
बारामतीतील मतदानाची आकडेवारी
बारामती लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची आकडेवारी 61.7 टक्के होती. यावेळी ही आकडेवारी एकूण 59.50 टक्के आहे.
- बारामती विधानसभा मतदारसंघात - 69.48 टक्के
- इंदापूर विधानसभा मतदारसंघात - 67.12 टक्के
- दौंड विधानसभा मतदारसंघात - 60.29 टक्के
- भोरमध्ये विधानसभा मतदारसंघात - 60.11 टक्के
- पुरंदर विधानसभा मतदारसंघात - 53.96 टक्के
- खडकवासला विधानसभा मतदारसंघात - 51.55 टक्के