आज सुनेत्रा पवार यांनी शक्तिप्रदर्शन करीत बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडील चल-अचल संपत्ती, दागिने, कर्ज, वाहनं आदी माहिती देण्यात आली आहे. मात्र त्यांनी आपली माहिती दिलेल्या या प्रतिज्ञापत्रातील आकड्यांमध्ये गोंधळ असल्याचं समोर आलं आहे.
सुनेत्रा पवारांकडे एकूण संपत्तीतील जंगम मालमत्ता 12 कोटी 56 लाख 58 हजार 983 इतकी असून स्थावर मालमत्ता ही 58 कोटी 39 लाख 40 हजार 751 किंमतीची आहे. याशिवाय त्यांनी स्वत: खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तेची किंमत 18 कोटी 11 लाख 72 हजार 185 इतकी आहे. याशिवाय सुनेत्रा पवार यांनी त्यांच्याकडील दागिन्यांची माहिती दिली.
त्यांनी सादर केलेल्या दागिन्यांच्या किमतीच्या बेरजेच्या आकड्यात गोंधळ दिसून आला. आधी आपण त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आकडेवारी पाहूया..
35 किलो चांदीच्या वस्तू - 24,99,555
सोन्याचे दागिने - 51,84,060
28 कॅरेट हिऱ्यांचे दागिने - 24,50,920.
सुनेत्रा पवार यांच्या प्रतिज्ञापत्रात या दागिन्यांच्या आकड्यांची बेरीज 34 लाख 39 हजार 569 दाखवण्यात आली आहे. मात्र आम्ही याची बेरीज केली तेव्हा हा आकडा 1 कोटी 01 लाख 34 हजार 535 इतका आहे. त्यामुळे आकड्यांमध्ये घोळ झाल्याचं दिसून येत आहे. मात्र हा गोंधळ नजरचुकीमुळे झाला की यामागे इतर काही कारण आहे, यासंदर्भातील प्रतिक्रिया आम्हाला मिळू शकलेली नाही.