मुलांच्या मोहापायी तुमचे पक्ष फुटले - अमित शहांचा उद्धव ठाकरे, शरद पवारांवर हल्लाबोल

अमित शहांनी (Amit Shah) या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका करताना मोदी सरकारने राबवलेल्या योजनांचा पाढा वाचून दाखवला.

Advertisement
Read Time: 2 mins
भंडारा-गोंदीया:

राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी ऐन रंगात आलेली असताना गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौरा केला. काल काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ज्या भागात सभा घेतली. त्याच भंडारा-गोंदीया मतदारसंघात अमित शहा यांनी सभा घेत राहुल गांधींसह महाराष्ट्रातील इतर विरोधी पक्षांचा समाचार घेतला.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर साधला निशाणा -

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर काहीच महिन्यांमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सध्याच्या घडीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची जबाबदारी ही निवडणुक आयोगाच्या नियमानुसार अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे आहे. या घटनेनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांकडूनही भाजपवर वारंवार पक्ष फोडल्याचा आरोप होत आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना अमित शहा यांनी, उद्धव ठाकरे व शरद पवार यांना भाजपमुळे नाही तर तुमच्या मुलांच्या मोहापायी पक्ष फुटल्याचं सांगितलं.

यापुढे बोलत असताना अमित शहा यांनी महाराष्ट्राचा विकास हा उद्धव ठाकरे, शरद पवार नाही तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हेच करु शकतात असं सांगितलं. या भाषणात अमित शहांनी नाना पटोलेंवरही निशाणा साधला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष याच भागातून येतात. परंतु संपलेल्या शिवसेनेने आणि संपलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवून इथे काँग्रेसलाच संपवलं असा टोला अमित शहांनी सांगितला.

राहुल गांधीचाही घेतला समाचार -

याच भाषणात अमित शहांनी काँग्रेस खासदार राहुल गांधीवरही निशाणा साधला. भाजपने अब की बार चारसौ पार हा नारा दिला आहे. त्यामुळे विरोधक भाजपला बहुमत मिळालं तर ते या देशाचं संविधान बदलतील असा प्रचार करत आहेत. परंतु मला राहुल गांधींना सांगावंसं वाटतं की भाजपला गेली दोन टर्म हे पूर्ण बहुमत मिळत आहे. परंतु आम्ही या पूर्ण बहुमताचा उपयोग कधीही आरक्षण हटवण्यासाठी केला नाही. आम्ही त्या बहुमताचा उपयोग हे कलम ३७०, ट्रिपल तलाक सारख्या गोष्टी हटवण्यासाठी केल्याचं अमित शहा यांनी सांगितलं. इतकच नव्हे तर जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असंही अमित शहा म्हणाले.

Advertisement

अवश्य वाचा - मनोज जरांगेंकडून राजकीय पक्षांचं टेन्शन वाढवणारी घोषणा, आरक्षणाचा मुद्दा पुन्हा गाजणार

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात गरीबी हटवण्याचा नारा दिला आहे. हाच नारा इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी दिला होता...त्यामुळे अजुनही काँग्रेस गरिबी हटवू शकली नसल्याचं सांगत अमित शहांनी भाजप सरकारच्या काळातील घोषणांचा पाढा वाचून दाखवला.

Topics mentioned in this article