राज्यात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडताना दिसत आहे. त्यातच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत सर्व राजकीय नेत्यांनी जनतेशी संपर्क साधण्याकडे आपला भर दिला. यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला जेरीस आणणाऱ्या मनोज जरांगे पाटली यांचाही समावेश होता. चैत्यभूमीला भेट देण्याआधी जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलत असताना जरांगे पाटील यांनी केलेल्या घोषणेमुळे सर्व राजकीय पक्षांचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये राज्याच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जो मिळेल त्याला पाडा - जरांगे पाटील
बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाने आपल्याला न्याय दिला आहे. माझा मार्ग हा राजकीय नाही तर लोकचळवळीचा मार्ग आहे. त्यामुळे माझं मराठा बांधवांना आव्हान असणार आहे की तुम्ही सर्वांनी मतदान करा. मी कोणत्याही पक्षाचा नाही, त्यामुळे जो मिळेल त्याला पाडा. कारण कधीकधी पाडण्यात खूप मोठा विजय असतो. मी फक्त समाजातल्या गोरगरिबांच्या बाजूने आहे. आता समाज सरकारचा बरोबर कार्यक्रम करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
यावेळी बोलत असताना जरांगे पाटील यांनी ६ जूनपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर ४ जून ला मी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं. लोकसभा निवडुकीत मराठा बांधवांनी सहभाग घेतला नसला तरीही आम्ही विधानसभेची तयारी जोरदार करत असल्याचंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. आमच्या माता-भगिनी आजही आरक्षणाच्या लढाईसाठी रस्त्यावर आहेत, त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. महायुतीने आम्हाला काही दिलं नाही तसेच महाविकास आघाडीवाले तरी कुठे शहाणे आहेत. होतं ते आरक्षणही त्यांनी घालवलं असं म्हणत जरांगे पाटलांनी महायुतीसोबतच महाविकास आघाडीलाही आपल्या टीकेचं लक्ष्य केलं.
फडणवीसांचं मराठ्यांवर विशेष प्रेम -
यावेळी जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. फडणवीस यांचं मराठा समाजावर विशेष प्रेम आहे. आजही पोलीस आमच्या समाजातील लोकांवर गुन्हे दाखल करत आहेत. ज्यांनी मराठा समाजावर लाठ्या चालवल्या त्यांना बडतर्फ करायचं सोडून त्यांना प्रमोशन दिलं गेलं. त्यांना शाबासकीच द्यावी लागेल असं जरांगे पाटील म्हणाले.
याचवेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून समाजाला मोठी अपेक्षा होती. परंतु ज्या दिवशी त्यांनी करेक्ट कार्यक्रम करु असं वक्तव्य केलं तेव्हापासून ते मराठा समाजाच्या मनातून उतरले असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world