भाग्यश्री आचार्य/ ठाणे
भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी एकाच नावाच्या दोन उमेदवारांनी अर्ज भरल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. प्रामुख्याने महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याच नावाच्या आणखी एका सुरेश म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या मंत्रालयातील सेवा निवृत्त अधिकारी मिलिंद कांबळे यांच्या नावाचा एबी फॉर्म मिलिंद कांबळे नावाच्या दुसऱ्याच उमेदवाराने पळवून भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही माहिती मिळताच वंचितचे अधिकृत उमेदवार मिलिंद कांबळेंनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करत मिलिंद कांबळेंविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे.
(नक्की वाचा: बारामतीत अजित पवार-शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; सांगता सभेआधीच्या रॅलीतील प्रकार)
एबी फॉर्म पासून उमेदवार 'वंचित'
भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या जागेकरिता गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा म्हात्रे आणि वंचित आघाडीने पाठिंबा दिलेल्या निलेश सांबरे या दोघांमध्ये उमेदवारी मागे घेण्यावरून चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आपला एक उमेदवार या लोकसभा क्षेत्रामध्ये असावा या हेतूने वंचित बहुजन आघाडीने मिलिंद कांबळे या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला एबी फॉर्म देण्याचे ठरवले. त्यानुसार कांबळे हे वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची जबाबदारी उल्हासनगर येथील मिलिंद काशिनाथ कांबळे यांच्याकडे दिली होती.
(नक्की वाचा: रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला, दानवेंनी काय केलं?)
ज्यावर सोपवली जबाबदारी त्याने केला घात
अधिकृत उमेदवार असलेले मिलिंद देवराम कांबळे यांच्याकडील पक्षाचे एबी फॉर्म आणि अन्य महत्त्वाची मूळ कागदपत्रे आपल्या ताब्यात घेऊन केवळ नामसाधर्म्य असल्याचा फायदा घेत मिलिंद देवराम कांबळे यांची अर्जप्रक्रिया पूर्ण न करता मिलिंद काशिनाथ कांबळे यांनीच आपला उमेदवारी अर्ज वंचित बहुजन आघाडीच्या नावाने दाखल केला. आपल्याला उमेदवारीपासून वंचित ठेवल्याचे लक्षात येताच मिलिंद देवराम कांबळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करत भिवंडी पोलीस स्टेशनमध्येही धाव घेतली.
(नक्की वाचा: राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल)
मात्र वंचित आघाडीचे उमेदवार वंचित राहिले असले तरी आता वंचित बहुजन आघाडी पक्ष नेमके कोणाला पाठिंबा देणार? त्यांची भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.