शुभम बायस्कार, प्रतिनिधी
BJP and AIMIM alliance in Amravati : राज्यातील नगरपालिकेनंतर नगरपरिषदेत अनेक अनपेक्षित युती समोर येत आहेत. दोन विरोधी विचारधारा असलेले पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आल्याचं अकोल्यात घडलं होतं. नगरपालिका निवडणुकीत अकोल्यातली अकोटमध्ये भाजप आणि एमआयएमने युती केली होती. ज्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करीत ही युती अमान्य असल्याचं सांगत तत्सम नेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ऐरवी एमआयएमवर तीव्र टीका करणाऱ्या भाजपने सत्तेच्या लालसेपोटी एमआयएमशी युती केल्याचं म्हटलं जात होतं. आता नगरपरिषदेतही असाच एक प्रकार अमरावतीतून समोर आला आहे.
सभापतीपदासाठी भाजप आणि एमआयएम एकत्र
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेमध्ये भाजप आणि एमआयएममध्ये युती झाल्याचं समोर आलं आहे. समितीच्या सभापती पदािचसाठी भाजप आणि एमआयएमने एकमेकांना साथ दिली. एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत आला आहे. यानंतर एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद मिळाले. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमसोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भाजप आणि एमआयएमच्या पक्षश्रेष्ठी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.