मुलुंड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पत्र लिहून याबाबतची तक्रार केली आहे. कोटेचा हे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार होते. प्रचारादरम्यान त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. त्याचीही आठवण कोटेचा यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात करून दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमका प्रकार काय घडला ?
शुक्रवारी दिवसाचा प्रचार संपल्यानंतर मुलुंड (पश्चिम) येथील एका हॉटेलमध्ये कोटेचा टीम मेंबर सोबत ते जेवत होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारमधून तीनजण आले आणि त्यांनी कोटेचा यांच्या सुरक्षा पथकाला सांगितले की, कोटेचांनी त्यांना फोन करून भेटायला बोलावले आहे. कोटेचा यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता आपण कोणालाही बोलावले नसल्याचे त्यांनी सांगितले. माझा ठावठिकाणा त्यांना कसा लागला कारण प्रचारानंतरचा जेवणाचा कार्यक्रम हा खासगी कार्यक्रम होता आणि त्याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. जी तीन माणसे आली होती त्यातील एकाने त्याचे नाव नितीन भाई असल्याचे सांगितले होते. कोटेचा यांनी या प्रकाराबाबत बोलताना म्हटले की, "माझा ठावठिकाणा त्यांना कसा कळला या विचाराने मला धक्का बसला"
नक्की वाचा : शिवसैनिकाची बोटे छाटली, ठाकरेंनी त्यालाच स्टेजवर आणलं, पुढे काय झालं?
पाळत ठेवली जात असल्याचा संशय
ईशान्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवलेल्या कोटेचा यांनी पुढे सांगितले की, लोकसभेच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. कोटेचांच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला होता. सदर प्रकरणात दोनपेक्षा जास्त एफआयआर दाखल करण्यात आले होते. कोटेचा यांनी सदर प्रकारानंतर आरोप केला आहे की, मला स्पष्टपणे संशय आहे की माझे विरोधक पुन्हा एकदा माझ्या जीवाचे बरेवाईट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते वाईट हेतूने माझ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.