- काँग्रेसच्या शीतल म्हात्रे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक मतदार याद्यांतील घोटाळा उघड केला आहे
- अस्तित्वात नसलेल्या इमारतींमध्ये १४३ मतदार नोंदणीकृत असून ही इमारत फक्त कागदावरच अस्तित्वात आहे
- निवडणूक आयोगाने मतदार याद्यांतील हरकतींकडे दुर्लक्ष केले असून अंतिम यादीत त्रुटी कायम आहेत
BMC Election 2026: आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदार याद्यांमधील मोठ्या त्रुटींवरून आज काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन वेळा निवडून आलेल्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आज 'अदृश्य इमारती' (Ghost Buildings), अस्तित्वात नसलेले मतदार आणि कोरे 'एपिक' (EPIC) कार्ड यांचा वापर करून सुरू असलेल्या एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. हा घोटाळा म्हणजे आगामी निवडणुकीच्या निकालात फेरफार करण्यासाठी सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगामध्ये असलेले साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शीतल म्हात्रे यांनी सांगितले की, सत्ताधारी भाजप निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेचा गैरफायदा घेऊन मुंबईतील लोकशाही पायदळी तुडवण्यासाठी मतदार याद्या पद्धतशीरपणे दूषित करत आहे. अस्तित्वात नसलेल्या इमारतीत 143 मतदार असल्याचं समोर आलं आहे. या तपासणीत प्रामुख्याने "भागडालाने" (Bhagdalane) नावाच्या इमारतीचे उदाहरण समोर आले आहे. अधिकृत मतदार यादीनुसार, ही इमारत आयसी कॉलनी, रोड नंबर 5 येथे दाखवण्यात आली आहे. तिथे 143 मतदार नोंदणीकृत आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्या ठिकाणी अशी कोणतीही इमारत अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर बोलताना म्हात्रे म्हणाल्या, "ही इमारत फक्त कागदावर आणि मतदार यादीतच अस्तित्वात आहे. ती मुंबईतील सामान्य नागरिकांना दिसत नाही, पण निवडणूक आयोगाला मात्र स्पष्टपणे दिसत आहे. ही निव्वळ 'संघटित वोट चोरी' आहे." मतदार यादीच्या प्रारूप टप्प्यावर (Draft stage) आम्ही अधिकृतपणे हरकती नोंदवल्या होत्या असं ही त्या म्हणाल्या. निवडणूक अधिकाऱ्यांनी या त्रुटी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अंतिम यादीत आमच्या हरकतींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आता आम्हाला सांगितले जात आहे की नावे वगळता येणार नाहीत.
ही लोकशाहीची थट्टा आहे," असे म्हात्रे यांनी नमूद केले. निवडणूक आयोग आता स्वतंत्र घटनात्मक संस्था म्हणून नाही, तर भाजपची निवडणूक यंत्रणा म्हणून काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा घोटाळा केवळ एका इमारतीपुरता मर्यादित नाही. म्हात्रे यांनी उघड केले की, केवळ वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 100 हून अधिक अशा मतदारांची नावे आहेत. ज्यांच्या इमारतींचा पत्ता अपूर्ण आहे किंवा दिलेलाच नाही. धक्कादायक म्हणजे, त्यांनी अशा कोऱ्या मतदान पत्रांचे (EPIC) पुरावे सादर केले, ज्यावर फक्त 'एपिक' क्रमांक आहेत, पण मतदाराचे नाव किंवा पत्ता नाही. "कोरे मतदान कार्ड ही 'चूक' कशी असू शकते? हे कार्ड म्हणजे 'ब्लँक चेक' सारखे आहेत. कोणीही त्यांचा वापर करून बोगस मतदान करू शकते. हा जाणीवपूर्वक केलेला फौजदारी गुन्हा आहे.असं त्या म्हणाल्या.
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय भूमिकेचा संदर्भ देत म्हात्रे म्हणाल्या, "लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने सातत्याने भाजप कशाप्रकारे निवडणुका चोरते, हे उघड केले आहे. मुंबईतही मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वारंवार या अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे." गेल्या महिन्यात राज्य निवडणूक आयुक्त आणि बीएमसी अधिकाऱ्यांच्या भेटीत मिळालेली आश्वासने हवेत विरली असून हा घोटाळा सुरूच आहे, याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. मतदानाचा हक्क हा संविधानाने दिलेला सर्वात मोठा अधिकार असल्याचे सांगत म्हात्रे यांनी मुंबईकरांना आवाहन केले. त्या म्हणाल्या, "प्रत्येक मुंबईकराने आपल्या हक्कासाठी उभे राहिले पाहिजे. 'नो वोट चोरी मेरी गल्ली में' हा मुंबईकरांचा सामूहिक संकल्प असायला हवा." मुंबईकरांचे हक्क चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप सरकार विरोधात काँग्रेस आपला लढा सुरूच ठेवेल आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरेल, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world