जाहिरात

BMC Election 2026 : काँग्रेसचा 'गेम' फिरला, 'या' 16 प्रभागांत बंडखोरांनाच रसद देण्याची वेळ ! वाचा सविस्तर

BMC Election 2026 : वंचित बहुजन आघाडीसोबत झालेल्या जागावाटपावरून नाराज असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बंडखोरीचे निशाण फडकवले आहे.

BMC Election 2026 : काँग्रेसचा 'गेम' फिरला, 'या' 16 प्रभागांत बंडखोरांनाच रसद देण्याची वेळ ! वाचा सविस्तर
BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेससमोर पेच निर्माण झालं आहे.
मुंबई:

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेची चावी आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईच्या राजकारणात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची मानली जात असतानाच आता पक्षात मोठी चलबिचल पाहायला मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत झालेल्या जागावाटपावरून नाराज असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. त्यांनी  अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

 विशेष म्हणजे, सुरुवातीला या बंडखोरांमुळे पेच निर्माण झाला असताना आता पक्ष या १६ बंडखोर उमेदवारांच्या मागे ठामपणे उभे राहण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. यामुळे मुंबईतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जागावाटपाचा पेच आणि ऐनवेळी उडालेला गोंधळ

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली होती. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे वाटत असतानाच ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी मोठा पेच समोर आला. वंचितने 16 जागा काँग्रेसला परत केल्या, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेल्याने काँग्रेसला या जागांवर अधिकृत उमेदवार जाहीर करता आले नाहीत. 

यामध्ये प्रभाग क्रमांक 6, 11, 12, 13, 14, 15, 19, 21, 30, 46, 117, 153, 177, 182, 195 आणि 198 या प्रभागांचा समावेश आहे. या जागांवर अधिकृत उमेदवार नसल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आणि आता काँग्रेस पक्ष याच उमेदवारांना पाठबळ देण्याच्या विचारात आहे.

( नक्की वाचा : KDMC Election : कल्याण-डोंबिवलीतील 'त्या' 20 जागांचा निकाल आता कोर्टात ठरणार? महायुतीचं टेन्शन वाढलं! )

दहिसर ते गोरेगाव मधील जातीय समीकरणे

प्रभाग 6, 11, 12, 13, 14 आणि 15 जे आर-उत्तर आणि आर-मध्य विभागात येतात, तिथे गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव जास्त आहे. या भागात भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील होती, मात्र आता झालेल्या बंडखोरीमुळे उत्तर भारतीय मतांमध्ये फूट पडण्याची भीती आहे.

 कांदिवली आणि मालाड पट्ट्यातील प्रभाग 19, 21 आणि 30 मध्ये मराठी व दलित मतांची संख्या मोठी आहे. येथे काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांमुळे महाविकास आघाडीच्या मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोरेगावमधील प्रभाग 46 मध्ये मध्यमवर्गीय मतदार निर्णायक असून, तेथील काँग्रेसची बंडखोरी महायुतीच्या फायद्याची ठरू शकते असा अंदाज आहे.

मध्य आणि दक्षिण मुंबईतील आव्हाने

कुर्ला आणि चेंबूर परिसरातील प्रभाग 117, 153 आणि 177 मध्ये मुस्लिम तसेच दलित मतदारांची बँक मोठी आहे. या जागांवर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार उभे राहिल्यामुळे अधिकृत उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. येथे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम देखील सक्रिय असल्याने लढत चुरशीची होणार आहे. 

दुसरीकडे दक्षिण मुंबईतील वरळी आणि परळ पट्ट्यातील प्रभाग 182, 195 आणि 198 मध्ये मराठी मतदारांचे वर्चस्व आहे. येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये समन्वय असणे अपेक्षित होते, परंतु काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीमुळे या जागांवर आता बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

( नक्की वाचा : महापालिकेत महायुतीला बुस्टर डोस; भाजपाचे 44 तर शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी, वाचा सर्व नावं एका क्लिकवर )

युतीमधील समन्वयाचा अभाव आणि रणनीती

वंचित बहुजन आघाडीने ऐनवेळी निर्माण केलेल्या गोंधळामुळे काँग्रेसला आपली रणनीती बदलावी लागली आहे. आपल्याच बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्यासोबतच, काँग्रेस काही विशिष्ट प्रभागांमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनाही मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीत काँग्रेसने घेतलेली ही भूमिका त्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरण्याची चिन्हे आहेत. कार्यकर्त्यांमधील ही नाराजी निवडणुकीच्या निकालात भाजपला फायदा करून देणार की काँग्रेस आपल्या बंडखोरांच्या मदतीने बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com