BMC Election 2026 Result: मुंबई भाजपला सोडण्यासाठी शिवसेनेची अट? अंतर्गत गोटातून बाहेर आली मोठी माहिती

Who Will Be The Next Mayor Of Mumbai: भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेत भाजपला 2 वर्ष महापौरपद मिळावे अशी उघडपणे मागणी केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर कोणाचा होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीनंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपचे मिळून 118 नगरसेवक विजयी झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागा असून 114 हा बहुमतासाठीचा आकडा आहे. महायुतीने हा आकडा पार केला आहे. असं असतानाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दगाफटका होऊ नये आपले नगरसेवक एकसंध राहावेत यासाठी सगळ्या नगरसेवकांना मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं आहे. मुंबईचे महापौर अडीच वर्षांसाठी आपल्यालाही मिळावे यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुरू केलेले हे दबावतंत्र असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर अंतर्गत गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

मुंबईच्या बदल्यात दोन महापालिकांवर हवंय वर्चस्व

मुंबई महानगपालिकेमध्ये महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष या दोन महत्त्वाच्या पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे. सगळ्यात मोठा पक्ष असल्याने भाजपचा या दोन्ही पदांवर नैसर्गिकरित्या दावा आहे. मुंबईमध्ये भाजपचे 89 नगरसेवक जिंकून आले आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक जिंकून आले आहेत. संख्याबळ पाहाता जर शिंदेंच्या शिवसेनेने दगाफटका केला तर दोन महत्त्वाची पदे भाजपच्या हातून जाण्याची त्यांना भीती आहे.

नक्की वाचा: Election Results 2026: OBC फॅक्टर पवारांना नडला? भुजबळ, मुंडे निवडणुकीत न दिसल्याने फटका बसल्याचा दावा

या राजकीय परिस्थितीत शिंदेंना सोबत ठेवणे हे भाजपसाठी क्रमप्राप्त आहे. दुसरीकडे ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना हा मोठा पक्ष आहे. ठाण्यात 131 जागा असून त्यापैकी 75 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक जिंकून आले आहेत तर भाजपचे 28 नगरसेवक निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ही देखील शिंदेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये 122 जागा असून इथे शिवसेना आणि भाजपचे संख्याबळ जवळपास सारखे आहे. शिवसेनेचे 53 नगरसेवक निवडून आले आहेत तर भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्येही भाजप आणि शिवसेनेत महापालिकेवरील वर्चस्वासाठी अंतर्गत संघर्ष सुरू आहे. या दोन महापालिकांसाठी शिवसेनेने मुंबईत भाजपवर दबाव वाढवण्यास सुरूवात केली आहे. 

मनसेचे नगरसेवक शिंदेंना मदत करणार ?

भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेत भाजपला 2 वर्ष महापौरपद मिळावे अशी उघडपणे मागणी केली आहे.  जागा वाटपात भाजपाने नमते घेतले होते, जनतेला दिलेला शब्द पाळायचा असेल तर महत्वाची पदे मिळायला पाहिजेत असे डावखरे यांनी म्हटले, असं होणार नसेल तर आम्ही विरोधी पक्षाच्या बाकावर बसू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ठाण्यात शिवसेना झुकण्यास तयार नाहीये. कल्याण-डोंबिवलीमध्ये मथुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे मनसेचे 2 उमेदवार मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. मनसेचे 5 नगरसेवक जिंकून आले आहेत.

Advertisement

नक्की वाचा: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, पोलिसांची खरडपट्टी

मनसेचे 5 आणि मशाल चिन्हावर निवडून आलेल्या दोन नगरसेवकांसह मिळून एकूण 9 नगरसेवक बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले असून. गट तयार होण्यापूर्वीच पाठिंब्यासाठी ज्या हालचाली शक्य आहेत त्या करणे शिवसेना आणि भाजपने सुरू केलं आहे. हे सगळे जण शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत महापौरपद हवे असेल तर ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद आम्हालाच मिळायला हवे अशी अट शिवसेनेने घातली असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे की खासदारांना भेटण्यासाठी गेलेले ठाकरे गटाचे दोन नगरसेवक परत शिवसेना ठाकरे गटाकडे आज येणार आहे आहे माहिती शिवसेना ठाकरे गटाचे सचिन बासरे यांनी दिली आहे.