BMC election results 2026 : मुंबईचा 'बॉस' कोण? सर्वाधिक जागा जिंकत भाजप ठरला नंबर 1 चा पक्ष!

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीचा मराठी मतांवर काही प्रमाणात परिणाम होईल हे जाणून उमेदवार अचूक उभे केले.

जाहिरात
Read Time: 3 mins

BMC election results 2026 : १६ जानेवारी सकाळपासून महानगरपालिका निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत आणि मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांचं चित्र स्पष्ट होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकड्यांनुसार, भाजप २२७ पैकी ८६ जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गट ७१ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे शिंदे गट २९ जागांवर, काँग्रेस ७, मनसे ६ जागांची आघाडी घेतली आहे. 

राज्यातील २९ महानगरपालिकांबद्दल सांगायचं झाल्यास, एकूण २८६९ प्रभागांपैकी भाजपने ९८७ जागांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिंदे गट २७१ जागांवर, काँग्रेस १७१, उद्धव ठाकरे गट १३७ , अजित पवार गट १११, एमआयएम ४७ जागा आघाडीवर आहेत. यावरुन स्पष्ट होतंय की, महापालिका निवडणुकीत देवेंद फडणवीसांची बुलेट सुसाट चालली. 

जेन झीकडून फडणवीसांना पसंती? 

विधानसभेत भाजपला १३२ जागा...नगरपालिका निवडणुकीत भाजप २०० पार..आता महापालिका निवडणुकीत भाजपचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. राज्यभरात भाजपा हा सर्वाधिक जागा जिंकत नंबर 1 चा पक्ष ठरला आहे. सर्व पालिकांमध्ये भाजपानं निर्विंवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. मुंबई महापालिकेत भाजपाने 2017 च्या तुलनेत जास्त जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रानं पुन्हा एकदा फडणवीसांच्या नेतृत्वावरच शिक्कामोर्तब केल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई, मराठवाडा, विदर्भासह सर्व भागांत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर या मेट्रो सिटीमध्ये भाजपच अव्वल ठरलीय. मराठी, अमराठी आणि जेन झीनं फडणवीसांना पसंती दाखवल्याचं चित्र आहे. 

Advertisement

नक्की वाचा - BMC Election Ward 194 Result: दादरमध्ये चक्र फिरलं! सदा सरवणकरांचे पुत्र समाधान सरवणकरांचा दारुण पराभव; ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे विजयी

मुंबईसह राज्यभरातल्या महापालिका प्रचारामध्ये विजयाचा झेंडा फडकवणं तेवढं सोपंही नाही. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अचूक रणनीती आखली आणि  प्रत्यक्ष ग्राऊंडवर जाऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. संघटन मजबूत केलं...फडणवीसांनी सुरुवातीलाच मुंबईचा महापौर मराठी होणार, हे सांगून मराठीच्या मुद्द्यावर मात दिली. ठाकरे बंधूंच्या युतीचा मराठी मतांवर काही प्रमाणात परिणाम होईल हे जाणून उमेदवार अचूक उभे केले. या सगळ्यासह फडणवीसांनी राज्यभरात झंझावाती प्रचार केला. 

Advertisement

पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची एकही सभा नाही
 
विशेष म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची एकही सभा झाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकूण ७७ प्रचार कार्यक्रम केले. त्यामध्ये सभा आणि रोड शो होते ३७. मुंबई, नागपूर, पुणे, सांगली, अकोला, जालना, परभणी, नांदेड, धुळे, लातूर, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, अहिल्यानगर, वसई विरार, मीरा भाईंदर, सोलापूर, पिंपरी चिंचवड, नाशिक, नवी मुंबई, इचलकरंजी, चंद्रपूर, अमरावती, जळगांव, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये फडणवीसांनी सभा आणि रोड शो केले.  ठाणे, संभाजीनगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि पनवेलमध्ये जाहीर मुलाखती दिल्या, तर विविध माध्यमांना ३३ मुलाखती दिल्या. मुंबईच्या लढाईबद्दल बोलायचं झालं, तर मुंबईची लढाई सरळ साधी, सोपी होती. मुंबईची लढाई ठाकरे विरुद्ध फडणवीस अशीच होती आणि विधानसभेनंतर मुंबईसह राज्यात धुरंधर ठरलेत ते देवेंद्र फडणवीस.  

महानगरपालिकेच्या निकालानंतर उपस्थित झालेले काही प्रश्न पुढीलप्रमाणे...

  • मुंबईतल्या निकालानं निर्माण झालेले प्रश्न?
  • देवेंद्र फडणवीस हेच भाजपाचे विनिंग मशिन?
  • दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचं काय होणार?
  • दोन्ही पवारांना मुंबई, पुण्यानं का नाकारलं?
  • शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व धोक्यात ?
  • राज ठाकरेंच्या मनसेचं अस्तित्व संपुष्टात आलंय का?
  • एकनाथ शिंदेंना मुंबईतल्या मराठी मतदारांनी नाकारलं?
  • अजित पवारांची जादू पुण्यात का चालू शकली नाही?
  • महायुतीत नसतील तर अजित पवारांचं राजकीय महत्व कमी?
  • मुंबईसह इतर ठिकाणी एमआयएमचं यश काय सांगतं?
  • मुस्लिम मतं सपाकडून एमआयएमकडे गेलीयत का?
  • मुंबईत काँग्रेसला शेवटची घरघर लागलीय का?