मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी आपली तयारी सुरू केली आहे. उमेदवारांची चाचपणी ही सुरू आहे. तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यात ही आघाडी किंवा युती होणार की नाही याबाबत अजूनही चित्र स्पष्ट नाही. त्यात आता समाजवादी पार्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुंबई महापालिकेच्या 150 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका समजला जात आहे. समाजवादी पक्षाची मुंबईत काही वार्डमध्ये चांगली ताकद आहे. ही मते निकालावर परिणाम करणारी ठरू शकतात.
महाविकास आघाडीपासून समाजवादी पक्षाने आपले नाते तोडले आहे. त्यांनी मुंबई महापालिकेच्या 150 जागा लढवण्याचं जाहीर केलं आहे. सपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली आहे. समाजवादी पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. इस्लाम जिमखाना येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समाजवादी पक्ष मुंबई महानगरपालिका निवडणूक संपूर्ण ताकदीने स्वतंत्रपणे लढवेल असं त्यांनी सांगितलं.
मागील निवडणुकीत समाजवादी पक्षाने काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत समझोता केला होता. मात्र आपला विश्वासघात झाला असा दावा त्यांनी या निमित्ताने केला. विधानसभेच्या निवडणुकीत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख संपेपर्यंत समाजवादी पक्षाला एकही जागा देण्यात आली नाही. नंतर अचानक दोन जागा देण्यात आल्या. त्याबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळेच यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं आझमींनी सांगितलं आहे.
समाजवादी पक्षाची मुंबई पूर्वी चांगली ताकद होती. एक वेळ अशी होती की पक्षाचे जवळपास 25 नगरसेवक मुंबई महापालिकेत होते. पणनंतर ही संख्या कमी कमी होत गेली. पण समाजवादी पक्षाचे अस्तित्व प्रत्येक महापालिकेत दिसून आले आहे. मुस्लीम मतदार मोठ्या संख्यने समाजवादी पक्षाच्या मागे उभे राहाताना दिसले आहेत. जर या निवडणुकीत समाजवादी पक्ष स्वतंत्र लढणार असेल तर त्याचा फटका महाविकास आघाडीतील घटक पक्षांना बसण्याची दाट शक्यता आहे. शिवाय काही समिकरणंही बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.