बाळू धानोरकर हे काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार. त्यांनी चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून विजय मिळवत लोकसभा गाठली होती. त्यावेळी राज्यातून निवडून आलेले बाळू धानोरकर हे एकमेव काँग्रेसचे खासदार होते. पण त्यांचा वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी दिल्लीत रुग्णालयातच मृत्यू झाला. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. ते आपला खासदारकीचा कार्यकाळही पुर्ण करू शकले नव्हते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याची चर्चा झाली होती. तो मृत्यू आहे की घातपात अशीही चर्चा झाली. मात्र त्याबाबत त्यांच्या कुटुंबातील कोणीही काही बोलले नाही. आता बाळू धानोरकर यांच्या आई वत्सलाताई यांनी मौन सोडत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चंद्रपूरचे माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या आई वत्सलाताई यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलाचे म्हणजे बाळू धानोरकर यांचे ते जाण्याचे वय नव्हते असं त्या म्हणाल्या आहेत. त्यांचा घातपात झाला आहे. त्यामागे जवळचे किंवा बाहेरचे या पैकीच कोणी तरी आहेत असा थेट आरोपही त्यांनी केला आहे. बाळू धानोरकर यांचा मृत्यू व्हावा असे त्यांचे वय नव्हते. लोकांमध्ये ते मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होते. असा नेता लोकांमधून निघून गेला. त्यांचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळी मनात शंका आली होती. पण मला कोणी काही बोलू दिले नाही असेही वत्सलाताई म्हणाल्या.
ट्रेंडिंग बातमी - कुटुंब एक पण पक्ष अनेक! राजकारणात दबदबा असलेले 'हे' कुटुंब माहीत आहे का?
यावेळी त्यांनी बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावरही काही आरोप केले आहेत. बाळू यांच्या मोठ्या भावाला विधानसभेची काँग्रेसची उमेदवारी मिळू नये, यासाठी आपल्या सुनेनेच प्रयत्न केले. स्वतःच्या भावाला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. शेवटी वरोरा विधानसभा मतदार संघातून त्यांनी आपल्या भावालाच उमेदवारी मिळवून दिली. असा आरोप ही त्यांनी केला आहे. प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा मतदार संघातून आपले बंधू प्रविण काकडे यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यामुळे बाळू धानोरकरांच्या आई नाराज झाल्या आहेत.
ट्रेंडिंग बातमी - 'मविआचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे...' फडणवीस थेट बोलले
या विरोधात बाळू धानोरकरांचे मोठे बंधू अनिल धानोरकर यांनी विधानसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडू उमेदवारी दाखल केली आहे. बाळू धानोरकर यांच्या आई आपल्या मुलासाठी आता प्रचार करत आहेत. एकीकडे खासदार सून भावासाठी मतदार संघ पिंजून काढत आहे. तर दुसरीकडे सासू आपल्या लेकासाठी प्रयत्न करत असताना दिसत आहे. या घडामोडींमुळे आजपर्यंत एकत्र असलेले धानोरकर कुटुंब विभक्त झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.