जाहिरात

कुटुंब एक पण पक्ष अनेक! राजकारणात दबदबा असलेले 'हे' कुटुंब माहीत आहे का?

नंदूरबार जिल्ह्यातील चारही जागांवर एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षातून उमेदवार म्हणून उभे आहेत.

कुटुंब एक पण पक्ष अनेक! राजकारणात दबदबा असलेले 'हे' कुटुंब माहीत आहे का?
नंदूरबार:

प्रशांत जव्हेरी

सध्याच्या स्थितीत कोणता नेता कोणत्या पक्षात आहे हे सांगणे कठीण होवून बसले आहे. उमेदवारचं सोडा एकाच कुटुंबातील कोणता सदस्य कोणत्या पक्षात आहे हे ही सध्याच्या घडीला कोणी ठाम पणे सांगू शकणार नाही अशीच स्थिती आहे. अशीच स्थिती नंदुरबार जिल्ह्यात मोठे प्रस्थ असलेल्या एका कुटुंबाची झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या चारही जागांवर एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षातून उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभरात नंदुरबाराची सध्या जोरदार चर्चा आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात गावित कुटुंबाचा दबदबा आहे. यावेळी गावित कुटुंबातील चार सदस्य विविध विधानसभा मतदार संघातून  निवडणुक रिंगणात उतरले आहे. मात्र या सर्वांचे पक्ष हे वेगवेगळे आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मंत्री डॉ. विजयकुमार गावित सहावेळा नंदुरबार विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. यंदाही त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर विजयकुमार गावित यांचे बंधू राजेंद्रकुमार गावित यांनी विधानसभेपूर्वी भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांना शहादा विधानसभेसाठी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

ट्रेंडिंग बातमी - 'मविआचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे...' फडणवीस थेट बोलले

तर डॉ. गावित यांचेच दुसरे बंधू शरद गावित नवापूर विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. शरद गावित यांनी 2009 मध्ये समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. शिवाय त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचा पराभव केला होता. तर डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हीना गावित या दहा वर्षे भाजपच्या खासदार होत्या. त्यांनीही नुकताच भाजपचा राजीनामा दिला होता. त्या आता अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गटाचा वचनमाना जाहीर; उद्धव ठाकरेंनी काय दिलीत आश्वासने?

नंदुरबार जिल्ह्यातील एकाच प्रस्थापित परिवारातील चार सदस्य यंदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ही निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे चौघांची तोंडे चारही दिशांना आहेत.  डॉ. विजयकुमार गावित आणि राजेंद्रकुमार गावित या भावांमध्ये अनेक दिवसांपासून सख्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकसभेच्या वेळीही राजेंद्रकुमार गावित यांनी खासदारकीसाठी मुलाखत दिली होती. मात्र, डॉ हीना गावित यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळाली होती. डॉ. गावित यांचे दुसरे बंधू शरद गावित यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. एकंदरीतच गावित परिवारातील चार सदस्य चार विधानसभा क्षेत्रांत उमेदवारी करत आहे. असं असलं तरी सर्वांची राजकारणाची दिशा मात्र वेगळी आहे.