जाहिरात
This Article is From May 08, 2024

माजी नगरसेवकांच्या तिरंगी लढतीमध्ये पुण्याचा कारभारी कोण होणार?

Pune Lok Sabha Election 2024 : राज्यात सध्या भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार आहे. सत्तेचा हा पॅटर्न पुण्यात यापूर्वीच दिसला आहे.

माजी नगरसेवकांच्या तिरंगी लढतीमध्ये पुण्याचा कारभारी कोण होणार?
Ravindra Dhangekar, Murlidhar Mohol, Vasant More : माजी नगरसेवक पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार आहेत.
पुणे:

महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र अशी पुण्याची पूर्वापार ओळख आहे. देशातील वेगानं वाढणारं शहर, तसंच माहिती आणि तंत्रज्ञानातील क्रांतीनंतर प्रमुख 'आयटी हब' ही पुण्याची नवी ओळख झालीय. एकवीसाव्या शतकातील पुणं हे तरुणांचं शहर आहे. 'पूर्वीचं पुणं' राहिलं नाही अशी तक्रार इथं प्रत्येक गल्लीत ऐकू येते. त्याचबरोबर पुण्याचे प्रश्नही आता बदललेत. या बदलत्या प्रश्नाबरोबरच बदललेल्या राजकीय समीकरणामुळे पुण्यातील लोकसभा निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास

स्वातंत्र्यापूर्वी पुणे हे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचं केंद्र होतं. न्या. रानडे, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक या पुण्यातील अभ्यासू आणि प्रमुख नेत्यांनी स्वातंत्र्यचळवळीला दिशा दिली. पुणे शहरानं अभ्यासू खासदारांची परंपरा स्वातंत्र्यानंतरही सांभाळली. काकासाहेब गाडगीळ, ना.ग. गोरे, मोहन धारिया, विठ्ठलराव गाडगीळ या काँग्रेस आणि काँग्रेसेतर खासदारांनी पुण्याचं नेतृत्त्व केलं.

पुण्यात 1991 साली भाजपाचा खासदार पहिल्यांदा निवडून आला.अण्णा जोशी खासदार झाले.त्यानंतर 1996 साली काँग्रेसच्या सुरेश कलमाडींनी ही जागा भाजपाकडून हिसकावून घेतली. 2004 आणि 09 मध्येही कलमाडी पुण्याचे खासदार होते. 2014 मधील मोदी लाटेत पुण्यावर पुन्हा भाजपानं झेंडा फडकवला.तेव्हांपासून गेली 10 वर्ष पुण्याची जागा भाजपाकडं आहे. 2014 मधील निवडणुकीत अनिल शिरोळे तर 2019 साली गिरीश बापट   गिरीश बापट पुण्यातून विजयी झाले.

( नक्की वाचा : 'एका अतृप्त आत्म्यामुळे राज्य अस्थिर' पुण्यातल्या सभेत पंतप्रधानांचा रोख कुणाकडे? )
 

भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीचा पुणे पॅटर्न

राज्यात सध्या भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार आहे.  सत्तेचा हा पॅटर्न  पुण्यात यापूर्वीच दिसला आहे. पुणे महापालिकेत काँग्रेसला दूर करण्यासाठी हे तीन पक्ष एकत्र आले होते. या तीन पक्षांच्या आघाडीचा 'पुणे पॅटर्न' एकेकाळी राज्यात गाजला होता. पुणे पॅटर्नचा आधार घेत पुणे महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता मिळवली. तर 2017 साली भाजपा पुणे महापालिकेत सत्तेत आली.

(नक्की वाचा : मावळातून श्रीरंग बारणे हॅटट्रिक मारणार? की संजोग वाघेरे मशाल पेटवणार?)
 

उमेदवारीसाठी चुरस

गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपाचा लोकसभा उमेदवार कोण होणार? हे लवकर निश्चित झालं नव्हतं. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसंच माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांची नावं चर्चेत होती.अखेर भाजपानं मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. तर काँग्रेसकडूनही अनेक जण इच्छूक होते. या सर्वांना मागं टाकत कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील मतं आहेत.मनसेनं लोकसभा निवडणूक न लढता महायुतीला पाठिंबा दिलाय. पण, मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत.या तिन्ही प्रमुख उमेदवारांना महापालिकेत किमान 10 वर्ष काम करण्याचा अनुभव आहे. महापालिकेत एकेकाळी एकत्र काम केलेले हे मित्र आता लोकसभेत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.

पुण्यातील तीन्ही प्रमुख उमेदवारांना महापालिकेत काम करण्याचा अनुभव आहे.

पुण्यातील तीन्ही प्रमुख उमेदवारांना महापालिकेत काम करण्याचा अनुभव आहे.

पक्षीय बलाबल

पुणे लोकसभा मतदारसंघात  शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती,पुणे कॅन्टॉन्मेंट आणि कसबा पेठ असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती आणि पुणे कॅन्टॉन्मेंट या चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तर कसबा पेठेतमध्ये स्वत: रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत.

पुण्याचे प्रश्न

मुंबईनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक शहरीकरण झालेल्या शहर म्हणून पुणे ओळखलं जातं. शहराची अनियंत्रित वाढ ही पुण्याची मुख्य समस्या आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी रस्त्यावरील ट्रॅफिकमुळे पुणेकर कायम त्रस्त असतात. तीन्ही प्रमुख उमेदवारांना महापालिकेच्या कामांचा अनुभव असूनही शहर नियोजन या कळीच्या मुद्यावर त्यांना या निवडणुकीत पुणेकरांना सामोरं जावं लागणार आहे.

भाजपाचं प्राबल्य असलेले कोथरुड आणि पर्वती  मतदारसंघ ही मुरलीधर मोहोळ यांची जमेची बाजू आहे. तर रवींद्र धंगेकर हे पुण्यातील सर्वात लहान अशा कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांना आमदार करण्यात  मोहोळ यांनी मोठी मेहनत घेतली होती. त्या कष्टाचं बक्षीस त्यांना लोकसभेच्या उमेदवारीत मिळालंय. कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेचं खासदार करुन पुण्यात मोठ्या संख्येनं असलेल्या ब्राह्मण मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपानं केलाय.

( नक्की वाचा : शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी, जनता नेत्यासोबत की अभिनेत्यासोबत?)

स्थानिक आणि राष्ट्रीय

पुण्यात झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो तसंच शहराच्या विकासाचं व्हिजन मांडलं होतं.  मोहोळ यांच्या प्रचाराचा सर्व फोकस हा नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी पुणेकरांनी खासदार निवडून द्यावा हा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाला मानणारा मोठा मतदार पुण्यात आहे. त्याचबरोबर मोदींचा करिश्मा हा देखील फॅक्टर मुरलीधर मोहोळ यांच्या बाजूनं आहे.

भाजपाकडून राष्ट्रीय प्रश्न मांडले जात असताना काँग्रेसनं प्रचारात स्थानिक मुद्यांवर भर दिलाय. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाला पराभूत केल्यानं रवींद्र धंगेकरांचं पुण्यात आणि राज्यात मोठं नाव झालंय. हाच 'कसबा पॅटर्न' पुणे लोकसभेतही रिपीट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यावेळी त्यांना काँग्रेसच्या सर्व गटांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मतदारांची किती साथ मिळते हे देखील महत्त्वाचं असेल.

पुण्यात मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला 65 हजार मतं मिळाली होती. यंदा वंचितनं वसंत मोरे सारखा संपूर्ण पुणे शहराला माहिती असलेला उमेदवार दिलाय. वंचित आणि महाविकास आघाडी यांचा मतदार साधारण एक असल्यानं मतविभागणी होणार हे नक्की आहे.त्याचबरोबर मनसेचे किती मतदार मोरेंना मतदान करणार त्यावर त्यांची या निवडणुकीतील वाटचाल आणि इतर दोन उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असेल.

मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे या तीन्ही उमेदवारांचा सोशल मीडियावर फॉलोअर मोठा आहे. या तिघांचीही सोशल मिडिया टीम ही नेहमी सक्रीय असते. सोशल मीडियातील फॉलोअर्सना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नेऊन आपल्या बाजूनं मतदान करण्यात कोणता उमेदवार अधिक यशस्वी ठरतो तो पुण्याचा पुढचा कारभारी (खासदार) असेल, हे निश्चित.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com