'लाडक्या बहिणींनो,' इकडं लक्ष द्या! तुमच्या पैशांबाबत मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

रामराजे शिंदे, प्रतिनिधी

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगानं ही घोषणा करताच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आचार संहिता लागू असताना मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजनांना बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना या विषयावर महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले मुख्यमंंत्री?

आमची नीयत साफ आहे, देण्याची वृत्ती आहे. लाडक्या बहिणीला कायम पैसे मिळतील. ॲडव्हान्स देणारं आमचं सरकार आहे. ॲडव्हान्स घेणारं नाही.  आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा हप्ता जमा झाला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. जीआर किती काढले ते वाचा रद्द केलेले वाचू नका.  आम्ही जीआर वेळेवर काढले. त्याचा फायदा मिळू लागला, असंही मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 

कामाख्या देवीचं दर्शन करणार?

मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे आणि गुवाहाटीमधील कामाख्य़ा देवी याचं एक भावनिक नातं आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात 2021 साली बंड केलं. त्यावेळी शिंदे आणि सर्व आमदार गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. त्यावेळी त्यांनी सर्व आमदारांसह कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. मुख्यमंंत्री या विधानसभा निवडणुकांपूर्वी देखील कामाख्या देवीचं दर्शन घेतील अशी चर्चा होती. शिंदे यांनी यावेळी त्या प्रश्नाचंही उत्तर दिलं.  

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला येण्याचं आमंत्रण दिलं आहे. आपण कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं.

( नक्की वाचा : 'लाडक्या बहिणीं'ना मिळणार दिवाळी बोनस, थेट खात्यात जमा होणार 5500 रुपये, वाचा कोण आहे पात्र )
 

किती जागांवर तिढा?

महायुतीध्ये जागा वाटपबाबत लवकरच निर्णय होईल. याबाबत जास्त तिढा राहिलेला नाही. 30 ते 35 जागांवर निर्णय होणे बाकी आहे. राज्यात आम्ही चर्चा करणार गरज असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करू, असं शिंदे सांगितलं.

Advertisement