Exclusive : नागपुरात काँग्रेस 'सांगली पॅटर्न'च्या तयारीत, उबाठा गटाला दिला गंभीर इशारा

Congress vs Shivsena UBT : दक्षिण नागपूरची जागा काँग्रेसला मिळाली नाही तर इथं काँग्रेस नेते राजीनामे देऊन सांगली पॅटर्न राबवतील, असा इशारा काँग्रेसनं दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

संजय तिवारी, प्रतिनिधी

महाविकास आघाडीमध्ये सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहेत. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जागा वाटपावरुन मतभेद झाल्याची माहिती नुकतीच उघड झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील तर बैठकीला जाणार नाही, असा इशारा ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली होता. हा वाद ताजा असताना आता नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे.

दक्षिण नागपूरची जागा काँग्रेसला मिळाली नाही तर इथं काँग्रेस नेते राजीनामे देऊन सांगली पॅटर्न राबवतील, असा इशारा काँग्रेसनं दिला आहे. दक्षिण नागपूरच्या जागेसाठी महाविकास आघाडीतील ठाकरे गट प्रचंड आग्रही आहे. त्या विरोधात काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. उबाठा पक्षाला जागा दिली तर पोस्टरसुद्धा लावणार नाही. थेट राजीनामे देऊ असा इशारा दक्षिण नागपूर मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काँग्रेस नगरसेवर योगेश तिवारी, दक्षिण नागपूर युवक काँग्रेस अध्यक्ष सुशांत लोखंडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव अक्षय हेटे यांनी NDTV मराठीला दिलेल्या Exclusive प्रतिक्रियेमध्ये हा इशारा दिला आहे.

( नक्की वाचा : महाविकास आघाडीत मोठा तणाव, 'पटोले असतील तर चर्चा नाही', ठाकरे गटानं ठणकावलं! )

काय आहे सांगली पॅटर्न?

लोकसभा निवडणुकीच्यावेळी सांगली जागेवर काँग्रेसचा दावा होता. काँग्रेसचे विशाल पाटील या जागेवर लढण्यास इच्छूक होते. पण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आग्रही भूमिका घेत सांगलीची जागा स्वत:कडे घेतली. त्यानंतर विशाल पाटील आणि सांगलीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली. विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. उबाठा पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. तेव्हापासून सांगली पॅटर्न हा शब्द प्रचलित झाला आहे.