आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नवी दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युती झाली आहे. मागच्या निवडणुकीत दिल्लीतील सर्व जागा या भाजपने जिंकल्या होत्या. त्यामुळे यंदा हा गड भाजपच्या हातातून हिसकावून घेण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. याचदरम्यान काँग्रेसने आज १० जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले.
या दहा जागांमध्ये दिल्लीतील तीन जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थी राजकारणातून वर आलेला नेता कन्हैया कुमारला काँग्रेसने लोकसभेचं तिकीट दिलं आहे. या व्यतिरीक्त पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना काँग्रेसने पंजाबच्या जलंधर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.
मनोज तिवारी यांना आव्हान देणार कन्हैया कुमार -
ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघात कन्हैया आणि भाजप विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्यात सामना रंगणार आहे. अशी आहे काँग्रेसने आज जाहीर केलेल्या १० उमेदवारांची यादी...
काँग्रेसने दिल्लीतील तीन उमेदवार जाहीर केले आहेत. कन्हैया कुमारसह जेपी अग्रवाल यांना चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातून तर उदीत राज यांना उत्तर पश्चिम मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीतील सात जागांपैकी तीन जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आहेत. तर पूर्व दिल्ली, नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि दक्षिण दिल्ली या चार मतदारसंघात ‘आप' पक्ष निवडणूक लढवत आहे.
अवश्य वाचा - मुलांच्या मोहापायी तुमचे पक्ष फुटले - अमित शहांचा उद्धव ठाकरे, शरद पवारांवर हल्लाबोल
पंजाब-उत्तर प्रदेशमध्येही उमेदवारांची घोषणा -
दिल्लीतील तीन जागांशिवाय काँग्रेसने पंजाबमधील सहा जागांचीही घोषणा करण्यात आली आहे. पंजाबमध्ये अमृतसरमधून गुरजीत सिंग उजला, फतेहगड साहीबमधून अमर सिंग, भटिंडामधून मोहिंदर सिंग सिद्धू, संगरूरमधून सुखपाल सिंग खैरा आणि पटियाला मतदारसंघातून डॉ. धर्मवीर गांधी यांना तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय उत्तरप्रदेशच्या अलाहाबाद मतदारसंघातून उज्ज्वल रेवती रमण सिंह यांना उमेदवारी दिली आहे.