माघार नाहीच! सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष उमेदवार; चिन्हही ठरलं! 

अखेर आज सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आज त्यांचं निवडणूक चिन्हंही ठरवण्यात आलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
सांगली:

प्रतिनिधी,  रॉबिन डेव्हिड

सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी विरोध दर्शविला होता. सांगली या जागेवरुन मविआमध्ये चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासूनच विशाल पाटील या जागेवरुन निवडणूक लढवण्यावर ठाम होते. काँग्रेसने संधी दिली नाही तर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलं होतं. अखेर आज सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आज त्यांचं निवडणूक चिन्हंही ठरवण्यात आलं आहे. 

आज तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यानंतर सांगलीत काँग्रेस कमिटीसमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि फटाक्यांची आतिषबाजी केली. या मतदारसंघात एकास एक लढत करण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत झाले, मात्र हा मतदारसंघ काँग्रेसला डावल्यामुळे या ठिकाणी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. 

हे ही वाचा - Exclusive : अजित पवारांना कुटुंबाने एकटे पाडले, धनंजय मुंडे यांचा आरोप

सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार संजय काका पाटील, महाआघाडीचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील, ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे अशी चौरंगी लढत होत आहे. सांगली हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या मतदारसंघावर दावा केल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस पक्षामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. मात्र महाआघाडीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मतदारसंघ देण्यात आला. महाआघाडीकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला.

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंत दादा पाटील यांचे नातू आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी या ठिकाणी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेल्या विशाल पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आज विशाल पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज निश्चित झाला असून लिफाफा हे त्यांना निवडणूक चिन्ह म्हणून देण्यात आले आहे.

Advertisement