राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी (Sajjad Nomani) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नोमानी यांच्यावर आरोप करतानाच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही सडकून टीका केली आहे. फडणवीस यांनी महाविकास आघाडी (MVA) वर मतदारांमध्ये धर्माच्या आधारे फूट पाडण्याचा गंभीर आरोप केला आहे. शुक्रवारी फडणवीस यांनी खडकवासल्याचे उमेदवार भीमराव तापकीर यांच्यासाठी जाहीर सभा घेतली होती. या सभेमध्ये बोलताना त्यांनी ‘वोट-जिहाद' चा मुकाबला करण्यासाठी ‘मतांच्या धर्मयुद्धा' ची आवश्यकता असल्याचे म्हटले. या सभेनंतर फडणवीसांनी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी यही समय है सोए हुओं को जगाने का! असे म्हटले होते.
शनिवारी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी म्हटले की, "उलेमा काऊन्सिलचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी 17 मागण्या महाविकास आघाडीला दिल्या होत्या, या मागण्या भयानक आहेत. मुसलमानांना 10 टक्के आरक्षण द्या. 2012-2024 दरम्यान ज्या दंगली झाल्या त्या दंगलीतील मुस्लिम आरोपींवरील खटले मागे घ्या, आरएसएसवर बंदी घाला; अशा मागण्या केल्या आहेत. मविआतील पक्षांनी पत्र देऊन त्या मागण्या मान्य करू असे सांगितले आहे. हे सज्जाद नोमानी अपील करत आहेत की वोट जिहाद करा. ते सांगत आहेत की आमच्या वोट जिहादचे सिपेह सालार शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, राहुल गांधी आहेत. आम्ही देशाच्या इतिहासात निवडणुकीत इतके लांगुलचालन कधीही पाहिले नव्हते. मतांचे विभाजन करण्यासाठी, अल्पसंख्यांकांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी विरोधी पक्ष काम करत असतील तर त्याविरोधात सगळ्यांना एक व्हावेच लागेल. "