अझरुद्दीन शेख, प्रतिनिधी
धाराशिव लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्या आपला उमेदवारी अर्ज आज ( शुक्रवार ) दाखल करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सहभागी होणार नाही, शिवाय पवार साहेबांवर बोलण्याइतकी मी मोठी नाही, असं पाटील यांनी म्हंटलंय. सुनेत्रा पवार या बाहेरच्या आहेत असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्याबाबत अर्चना पाटील यांना विचारलं असता त्यांनी त्यावर बोलणं टाळलं.
'शरद पवार मला आदरणीय'
शरद पवार हे सुनेत्रा पवार यांना बाहेरची असे म्हणाले होते. त्याबाबत अर्चना पाटील यांना विचारण्यात आले. त्याबाबत बोलणं अर्चना पाटील यांनी टाळलं. शरद पवारसाहेब हे आपल्यासाठी आदरणीय आहे. शिवाय त्यांच्याबाबत बोलण्या इतकी मी मोठी नाही, असं म्हणत या विषयावर बोलणं अर्चना पाटील यांनी टाळलं. अर्चना पाटील या सुनेत्रा पवारांच्या नातेवाईक आहेत. त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धाराशिव मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढत आहेत.
धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, माजी मंत्र्याचा मुलगा पक्ष सोडणार
सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाणार नाही
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला आपण जाणार नाही. कारण, तुमच्या धाराशिव जिल्ह्यातला प्रचार पाहा, आपण दोघी पार्लमेंटमध्ये भेटूया असं त्यांनी मला सांगितलंय, असं पाटील यांनी सांगितलं. महायुतीचे आमदार बहिणीला दिल्लीत पाठवण्यासाठी एकजूट झाले आहेत. मोदी विरुद्ध गांधी अशी ही लढत आहे. कुणाला पंतप्रधान करायचं हे जनतेनं ठरवलंय. मोदींचे हात बळकट करण्यासाठी मला विजयी करा, असं आवाहानही पाटील यांनी केलं.