अमरावती लोकसभेत एकामागू एक राजकीय उलथापालथी होत आहे. राणा आणि बच्चू कडू यांच्यातला सभेच्या मैदानाचा वाद मिटतो ना मिटतो तर आता एका नव्या वादाने तोंड वर काढले आहे. अमित शहा यांची सभा अमरावतीमध्ये होत आहे. या सभेसाठी नवनीत राण यांनी मोठी बॅनरबाजी केली आहे. सभे ठिकाणी जो मुख्य बॅनर लावण्यात आला आहे त्यावरून अजित पवारांचा फोटो मात्र गायब आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेतला आहे. नुसता आक्षेप घेतला नाही तर थेट धमकीच दिली आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.
हेही वाचा - विखेंची मालमत्ता वाढली, लंकेंचे कर्ज वाढले, दोघांकडे संपत्ती किती?
मिटकरींची धमकी काय?
नवनीत राणा यांच्यासाठी अजित पवारांनी नुकतीच सभा घेतली. त्यानंतर अमित शहांची सभा होत आहे. अशा वेळी मंचावर लावलेल्या बॅनरमध्ये अजित पवारांचा फोटो नाही. नवनीत राणांची ही मोठी चूक आहे. महायुतीमध्ये मिठाचा खडा का टाकताय असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे. याची मोठी किंमत मोजावी लागेल अशी धमकीच मिटकरी यांनी दिली आहे. त्यामुळे ही चुक वेळीच सुधारा असा सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत.
शहांच्या सभेतून अजित पवारांचा फोटो गायब
अमित शहांच्या सभेसाठी मंचावर मोठे पोस्टर लावण्यात आले आहे. त्याच्या एका बाजूला नवनीत राणा आणि पंतप्रधान मोदींचा फोटो आहे. तर दुसऱ्या बाजूला अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा फोटो आहे. त्यात अजित पवारांचा फोटो कुठेही दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहे. त्या नाराजीला मिटकरी यांनी वाट करून दिली.
राणांसाठी शहांची सभा
अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रचार सभा होत आहे. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर ही सभा होती आहे. मात्र, सभेच्या मुख्य व्यासपीठावरील बॅनरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी दोन दिवसांपूर्वी अजित पवार अमरावती येऊन गेलेत. मात्र, असं असतानाही मुख्य व्यासपीठावरील बॅनरवर अजित पवारांचा फोटो गायब असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.