अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. मात्र निवडणुकीच्या मैदानात हे दोघे जरी तुल्यबळ असले तरी संपत्तीच्या बाबतीत मात्र विखे पाटील हे भलतेच सरस आहेत. एकीकडे गेल्या पाच वर्षात विखेंची संपत्ती वाढल्याचे दिसून येत आहे तर निलेश लंकेंचे कर्ज वाढले असल्याचे समोर आले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या कागदपत्रांवरून हे स्पष्ट झाले आहे.
सुजय विखेंची संपत्ती किती?
सुजय विखे पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारी अर्ज बरोबर शपथपत्र सादर केले आहे. त्यात त्यांनी त्यांच्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. सुजय विखे यांनी त्यांच्या पत्नी धनश्री विखे आणि दोन मुले यांच्या नावे एकत्रित 29 कोटी 28 लाख 88 हजार 999 रुपये इतकी संपत्ती आहे. सुजय विखे यांच्या नावावर 12 कोटी 15 लाख 69 हजार 585 रुपयाची स्थावर मालमत्ता आहे. तसेच 10 कोटी 95 लाख 70 हजार 893 रुपयाची जंगम मालमत्ता ही आहे. सुजय विखे पाटील यांच्या नावावर स्थावर आणि जंगम मालमत्तेचा विचार करता याचे एकूण मुल्य हे
23 कोटी 11 लाख 40 हजार 478 रुपये ऐवढे आहे. सुजय विखे यांच्यावर 3 कोटी 64 लाख रुपयाचे कर्ज आहे. तर विखेंकडे एकूण 35 लाखाचे दागिने आहेत. तर पत्नीकडे 45 लाखाचे दागिने आहेत.
निलेश लंकेंचे कर्ज वाढले
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नीलेश लंके यांच्या कर्जात वाढ झाल्याची बाब प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.
नीलेश लंके यांनी सन 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक लढविली. त्यांनी त्यावेळी त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता 15 लाख 35 इतकी होती. तर जंगम मालमत्ता 58 लाख 56 इतकी होती. तर जवळपास 32 लाख 28 हजाराचं त्यांच्यावर कर्ज होते. दरम्यान लोकसभेसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्थावर मालमत्ता चार लाखांनी वाढली आहे. मात्र जंगम मालमत्तेत कमालीची घट झाली आहे. तर कर्ज 32 लाखा वरून 37 लाखवर पोहोचले आहे.
नगरमध्ये विखे विरूद्ध लंके लढत
नगर लोकसभेत सुजय विखे यांच्या समोर निलेश लंके यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे सुरूवातीला एकतर्फी वाटणारी लढत आता चांगलीच रंगतदार स्थितीत पोहचली आहे. लंकेचे दहन करा असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरच्या सभेत केले होते. त्यानंतर निलेश लंके आणि त्यांचे कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले आहेत. सध्याच्या स्थितीत विखे विरूद्ध लंके असा थेट सामना इथे होत आहे. विखेंना धोबीपछाड देण्याचा चंग लंकेंनी बांधला आहे. त्यात ते किती यशस्वी होतात हे निकालानंतर स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world