Navi Mumbai Municipal Corporation Result : नुकत्याच राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुका पार पडल्या. सर्वाधिक जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. यंदा नवी मुंबईत 111 पैकी 66 जागांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आहे. त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाने 24 जागा जिंकत दुसरे स्थान मिळवले आहे. भाजपने बहुमताचा आकडा गाठला असल्याने भाजपचा महापौर हे निश्चित झालं आहे.
विनाकारण खुर्च्या बदलायच्या कशासाठी?
नवी मुंबई महानगरपालिकेत नवीन महापौर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा अनावश्यक खर्चाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापौर कॅबिनसाठी नव्याने रंगरंगोटी करण्यासह सुस्थितीत असलेल्या खुर्च्या बदलण्याच्या मागण्या पुढे येत असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे मनपा कार्यालयांमध्ये “विनाकारण खुर्च्या बदलायच्या कशासाठी?” असा सवाल उपस्थित होत असून आधीच आर्थिक तणावात असलेल्या महापालिकेसाठी हा खर्च कितपत योग्य आहे, असा प्रश्न कर्मचारी आणि नागरिकांकडून विचारला जात आहे.
महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींसाठी नव्या गाड्यांची खरेदी
अजून महापौर पदाची सूत्रे हाती येण्यापूर्वीच “महापौरांची लूट सुरू झाली” अशी कुजबुज प्रशासकीय कार्यालयांत ऐकू येत आहे. याचबरोबर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतींसाठी नव्या गाड्या खरेदी करण्याची तयारी सुरू असल्याचीही चर्चा रंगली आहे. जनतेच्या करातून मिळणाऱ्या निधीचा वापर ऐशोआरामासाठी न करता मूलभूत प्रश्न, प्रलंबित विकासकामे आणि नागरी सेवा-सुविधांवर व्हावा, अशी अपेक्षा नवी मुंबईकर व्यक्त करत आहेत. एकीकडे महापालिकेवर कर्जाचा बोजा, अपूर्ण प्रकल्प आणि नागरी समस्यांचा डोंगर असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या सुविधांसाठी होणारा खर्च पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
