लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. जो तो आपल्या परीने विश्लेषण करत आहेत. त्यात वेगवेगळ्या गोष्टींचाही विचार केला जाता आहे. राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत महायुतीला चितपट केले आहे. महायुतीत सर्वाधिक जागा या भाजपला मिळाल्या आहेत. त्या खालोखाल शिवसेना शिंदे गटाला जागा मिळाल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 7 जागांवर जिंकता आल्या आहे. महायुतीमध्ये शिंदे यांच्या वाट्याला 15 जागा आल्या होत्या. त्यापैकी 7 जागांवर त्यांना यश आले आहे. तर महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला 21 जागा मिळाल्या होत्या. त्या पैकी 9 जागांवर ठाकरेंना यश आले आहे. स्ट्राईक रेटचा विचार करता शिंदेंचा स्ट्राईक रेट ठाकरें पेक्षा सरस ठरत आहे. त्यामुळे आकड्यात जरी ठाकरेंनी शिंदेंवर मात केली असली तरी स्ट्राईक रेटमध्ये शिंदे काकणभर सरस ठरले आहेत. हीच काय ती या निकालातून त्यांना मिळालेली दिलासा देणारी बातमी ठरली आहे.
शिंदेंचा स्ट्राईक रेट चांगला
शिवसेनेत फुट पडल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे शिवसैनिक नक्की कोणा बरोबर, त्याच बरोबर खरी शिवसेना कोणती याचे उत्तर या निवडणुकीनंतर मिळणार होते. तसे पाहात उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रदर्शन करत जवळपास 9 जागांवर विजय मिळवला. तर एक जागा अगदी थोडक्यात गमावली. त्यामुळे ठाकरेंनी आपला दबदबा दाखवून दिला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या पदरात निराशा जरी पडली असली तरी एक बाब त्यांच्यासाठी दिलासा देणारी ठरली आहे. महायुतीत शिंदेंच्या वाट्याला केवळ 15 जागाच आल्या होत्या. असे असताना त्यांनी त्यातील जवळपास निम्म्या जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहीला आहे. त्या तुलनेत ठाकरेंना जास्त जागा मिळाल्या पण त्यांना जागा मात्र कमी जिंकता आल्या. मागील निवडणुकीत एकत्रीत शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या. यावेळी ठाकरेंच्या पारड्यात 9 तर शिंदेंच्या पारड्यात 7 अशा एकूण सोळा जागा मिळाल्या आहेत.
हेही वाचा - तुमच्या मतदारसंघातून कोण जिंकले, कितीचे मताधिक्य? पाहा एका क्लिकवर
भाजपला सर्वात जास्त फटका
राज्यात सर्वात जास्त नुकसान कोणाचे झाले असेल तर ते भाजपचे झाले आहेत. भाजपचे राज्यात 23 खासदार होते. 2019 ला भाजपने 25 जागा लढवल्या होत्या. त्या तुलनेत 2024 ला भाजपच्या वाट्याला 28 जागा आल्या. मात्र त्यांना त्या तुलनेत यश मिळाले नाही. 23 वरून भाजपची संख्या खाली येत ती 9 पर्यंत घसरली आहे. जवळपास 14 जागांचे नुकसान भाजपला सहन करावे लागले आहे. निवडणुकी आधी 45 पारचा नारा भाजपने दिला होता. 45 सोडा मागील वेळच्या जागाही भाजपला टिकवता आल्या नाहीत. त्या पेक्षाही वाईट अवस्था झाली, ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची. त्यांनी महायुतीत 4 जागा लढवल्या. त्या पैकी त्यांना केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. बारामतीत पत्नी सुनेत्रा पवार यांनाही त्यांना निवडून आणता आले नाही. उस्मानाबादमध्येही त्यांच्या उमेदवार अर्चना पाटील पराभूत झाल्या. या दोघींनाही मोठ्या फरकाने पराभव झाला.
हेही वाचा - 'आमच्याकडे आकडा आहे' संजय राऊतांनी प्लॅन सांगितला
काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष
राज्यात सर्वात जास्त फायदा हा काँग्रेसचा झाला आहे. काँग्रेसने आघाडीत 17 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 13 जागांवर काँग्रेसचे उमेदवार हे विजयी झाले आहेत. तर विशाल पाटील हे काँग्रेस बंडखोर उमेदवारही विजयी झाले आहेत. ते काँग्रेस बरोबरच राहाणार आहेत असे विश्वजित कदम यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेसचा हा आकडा 14 वर जावून पोहचला आहे.
शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक
शरद पवारांचा पक्ष फुटल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. नकली राष्ट्रवादी असेही त्यांच्या पक्षाला हिणवले गेले. त्याला चोख उत्तर पवारांनी या निवडणुकीतून दिले आहे. शरद पवारांनी 10 जागांवर निवडणूक लढवली. त्या पैकी 8 जागांवर पवारांनी विजय मिळवला आहे. तर साताऱ्याची जागा थोड्या मताधिक्याने गमवावी लागली. त्यामुळे सर्वात जास्त यशाचा स्ट्राईक रेट हा शरद पवारांचा राहीला आहे.