लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्याचं दिसून आलं आहे. वाढत्या उष्णतेचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे. अनेक नागरिकांनी वाढत्या उन्हामुळे मतदानाला जाणे टाळलं. मात्र पुढच्या टप्प्यांमध्ये देखील मतदानावर उष्णतेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमान असंच राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी घसरल्याबद्दल निवडणूक आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. उष्णतेच्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाने भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करुन चर्चा केलीय. या उच्चस्तरीय बैठकीत राज्यांच्या सचिवांनी उन्हापासून संरक्षणासाठी अधिक उपाययोजना करण्याचं आश्वासन या बैठकीत दिलं आहे.
नक्की वाचा - "निवडणूक आयोग भाजपची चमचेगिरी करणारा आयोग", अंबादास दानवेंचं टीकास्त्र
दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदारांसाठी अधिक सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारे देखील पावलं उचलणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय महापात्र यांनी याबाबत म्हटलं की, IMD सातत्याने निवडणूक आयोगाच्या संपर्कात आहे. हवामान अंदाज यासोबतच मासिक, साप्ताहिक आणि रोजच्या हवामानाबाबतचे अंदाज घेतले जात आहेत. निवडणूक आयोगाला उष्णतेच्या लाटेबाबतच्या अंदाजाची माहिती दिली जात आहे. वाढलेल्या तापमानाचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे वृद्ध, लहान मुले आणि आजारी नागरिकांना याचा जास्त होऊ शकतो.
(नक्की वाचा - 'जय भवानी' वरून निवडणूक आयोग अडले, ठाकरे थेट नडले, वाद पेटणार?)
चार राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा
हवामान विभागाने चार राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. यासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, तेलगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये रविवारी तापमानाचा पारा ४२ अंशांवर होता.
या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २३ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, झारखंड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक,आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांचा समावेश आहे.