शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणूक प्रचार गीत तयार केले आहे. या गीतामध्ये जय भवानी जय शिवाजी हा उल्लेख आहे. यातील जय भवानी हा उल्लेख काढून टाकावा अशी नोटीस निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला पाठवली आहे. ही नोटीस उद्धव ठाकरे यांनी धुडकावून लावली आहे. शिवाय जय भवानी जय शिवाजी बोलणारच असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवाय निवडणूक आयोगाला आमच्यावर कारवाई करायची असेल तर आधी त्यांनी मोदी आणि शहा यांच्यावर करून दाखवावी असे आव्हानच दिले आहे. त्यामुळे आगामी काळा निवडणूक आयोग आणि शिवसेना यांच्यात वाद पेटू शकतो अशी शक्यता आहे.
हेही वाचा - आंबेडकरांना धक्का! वंचितमध्ये फूट? 'या' जिल्ह्यात फटका बसणार?
नक्की प्रकरण काय?
केंद्रीय निवडणूक आयोगाने एक नोटीस शिवसेना ठाकरे गटाला पाठवली आहे. या नोटीसमध्ये ठाकरे गटाने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेल्या गीतातील दोन उल्लेख काढण्यास सांगितले आहे. त्यातला पहिला उल्लेख हा हिंदू हा तुझा धर्म हा आहे. तर दुसरा जय भवानी जय शिवाजी मधली जय भवानी हा उल्लेख वगळायला सांगितला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाने तिव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. शिवाय काही झाले तरी जय भवानी जय शिवाजी बोलणारच असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि शिवसेना यांच्यात वाद चिघळण्याची शक्यता आहे.
कारवाई करायची तर आधी...
दरम्यान या प्रकरणी कारवाई करायची असल्यास पहिली कारवाई मोदी आणि शहांवर करून दाखवावी असे आव्हानच त्यांनी आयोगाला दिले आहे. मोदींनी कर्नाटकच्या निवडणुकीत जय बजरंगबली अशी घोषणा दिली होती. तर अमित शहा यांनी मध्य प्रदेशमध्ये रामाचं मोफत दर्शन घडवू असं आश्वासन दिले होते. त्यांच्यावर निवडणूक आयोग कधी कारवाई करणार असा प्रश्नही ठाकरे यांनी यावेळी केला आहे. शिवाय मोदी आणि शहा यांना काही बोलण्याची मुभा दिली आहे का असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रात काय?
निवडणूक आयोगाच्या पत्राला उद्धव ठाकरे यांनी लव्ह लेटर असे म्हटले आहे. या पत्रात दोन गोष्टींबाबत आक्षेप नोंदवला आहे. निवडणूक प्रचार गीतात असलेले जय भवानी हा शब्द वगळावा असे या पत्रात म्हटले आहे. शिवाय हिंदू हा तुझा धर्म हा उल्लेख ही काढण्यास आयोगाने सांगितले आहे. दरम्यान या वाक्यात चुकीचं काय आहे असे ठाकरे म्हणाले आहेत. शिवाय त्यांनी ही नोटीस धुडकावून लावली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world