शुभम बायस्कार
Municipal Council Elections: नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवारी शेवटचा दिवस आहे. सर्वच पक्षांनी ही निवडणूक ताकदीने लढवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी दिली जात आहे. मात्र एक जिल्हा असा आहे जिथं थेट हिंदू विरुद्ध मुस्लीम असाच सामना रंगत आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशा स्थितीत नगराध्यक्ष कोण होणार? कोण आपले वर्चस्व दाखवणार याची उत्सुकता जिल्ह्यात आहे. हा जिल्हा दुसरी तिसरा कोणता नसून अमरावती जिल्हा आहे. या निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसने मुस्लिम चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसच्या या रणनीतीला शह देण्यासाठी भाजपानेही हिंदू कार्ड खेळलं आहे. ज्या चार ठिकाणी काँग्रेसने मुस्लिम उमेदवारांना मैदानात उतरवलं तिथे भाजपने हिंदू उमेदवारांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. शिवाय त्याला हिंदू विरुद्ध मुस्लीम असा रंग ही दिला जात आहे.
यात पहिली नगर परिषद आहे ती म्हणजे अंजनगाव सुर्जी. या नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या आशा बानो रशीद खान यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरुद्ध भाजपचे अविनाश गायगोले यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अंजनगाव सुर्जीमध्ये आशा बानो विरुद्ध अविनाश गायगोले यांच्या सामना रंगणार आहे. शिवाय उद्धव ठाकरे गटाचे दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे देखील या दोघांसमोर आव्हान उभं करण्याच्या तयारीत आहेत. संवेदनशील शहर म्हणून अंजनगाव सुर्जी शहराची ओळख आहे. या शहराला जातीय दंगलींची मोठी पार्श्वभूमी आहे.
नक्की वाचा - Teeth Cavity: दातातील किडीचा 1 मिनिटात गेम ओव्हर! हे आहेत 4 प्रभावी घरगुती उपाय
यानंतर दुसरी नगरपरिषद आहे ती म्हणजे चिखलदरा. चिखलदरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे शेख अब्दुल शेख हैदर यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने त्यांच्या विरुद्ध राजेंद्रसिंग सोमवंशी यांना मैदानात उतरवलं आहे. या दोघांमध्ये इथं मोठी लढत पाहायला मिळणार आहे. तर अचलपूर येथे काँग्रेसच्या नूर सबा एतेशाम नबील यांना उमेदारी देण्यात आली आहे. तर भाजपने विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी असलेल्या अभय माथने यांच्या पत्नी रुपाली यांना रिंगणात उतरललं आहे. अचलपूर शहर ही नेहमी चर्चेत असतं. इथं राष्ट्रीय तपास यंत्रणांनी छापे ही टाकले होते.
चौथी नगर परिषद ही चांदूरबाजार आहे. येथून काँग्रेसच्या फरहाना तब्बस्सुम मोहम्मद साजिद यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरुद्ध बजरंग दलाचे पदाधिकारी असलेले टिकू अहिर यांच्या मातोश्री कांता आहिर ह्या भाजपकडून मैदानात असणार आहेत. त्यामुळे या नगर परिषदेत मुस्लीम उमेदवार विरुद्ध हिंदू उमेदवार असे चित्र निर्माण झाले आहे. विदर्भात भाजप आणि काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. त्यात आता कोण बाजी मारतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.