Maharashtra Election Result 2024 : ते पुन्हा आले ! फडणवीसांच्या दमदार यशाचं रहस्य काय?

Maharashtra Election Result 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हा भाजपाचा मुख्य चेहरा होता. हा चेहरा मतदारांना पसंत पडला. हे निवडणूक निकालावरुन स्पष्ट झालंय.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Maharashtra Election Result 2024 : 'मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा', महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होऊ लागतातच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाजलेल्या भाषणातील या ओळी आता अनेकांना आठवत आहेत.

2019 मधील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली लढलेला भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपा आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. पण, उद्धव ठाकरे यांनी युती तोडली. त्यामुळे फडणवीसांना विरोधात बसावं लागलं. अडीच वर्षांनी भाजपा सत्तेत आली. पण, बदललेल्या समीकरणात फडणवीसांना मु्ख्यमंत्री होता आलं नाही. त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं.

या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देवेंद्र फडणवीसांनी दमदार कमबॅक केलंय. राज्यातील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हा भाजपाचा मुख्य चेहरा होता. हा चेहरा मतदारांना पसंत पडला. हे निवडणूक निकालावरुन स्पष्ट झालंय. फडणवीसांच्या नेतृत्त्वात भाजपानं बहुतेकांचे अंदाज धुळीला मिळवत 100 पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. 

( नक्की वाचा : Maharashtra Election Result : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी राजभवनात होणार नाही? )

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात फक्त 9 जागा मिळाल्या. त्या खडतर परिस्थितीमध्ये फडणवीसांनी हे यश खेचून आणलंय. त्यामुळे त्याला मोठं महत्त्व आहे. राज्याच्या राजकारणात खणखणीत नाणं आणि विश्वासर्ह चेहरा असल्याचं फडणवीसांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. 

फडणवीसांच्या ऐतिहासिक कामगिरीचं रहस्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

विकासाचं व्हिजन

महायुती सरकारच्या काळात मुंबई तसंच महाराष्ट्रात झालेले पायाभूत प्रकल्प, मुंबईत वाढलेलं मेट्रोचं जाळं, राज्यातील परकीय गुंतवणूक, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प, वाढवण बंदरामुळे होणारा राज्याला आणि देशाला फायदा हे सर्व मुद्दे फडणवीसांनी भाषणातून सातत्यानं मांडले. त्यांचे मुद्दे राज्यातील मतदारांना, विशेषत: शहरी मतदारांना भावल्याचं या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे.

Advertisement

आक्रमक हिंदुत्व 

देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण निवडणूक प्रचारात आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. 'व्होट जिहाद' ला 'धर्मयुद्ध' नं उत्तर द्या, हे आवाहन मतदारांना केलं. फडणवीसांच्या या प्रचारामुळे लोकसभेत निष्क्रीय राहिलेला भाजपाचा पारंपारिक मतदारांमध्ये उत्साह संचारला. ते पुन्हा सर्वशक्तीनीशी प्रचारात उतरले. त्याचबरोबर नवमतदारही भाजपाकडे आकर्षित झाले. त्याचा फायदा भाजपाला झाला. भाजपाला हा फायदा मिळवून देण्यात फडणवीसांची रणनीती यशस्वी ठरली.

( नक्की वाचा : Maharashtra Election Result : लोकसभेत कमावलं, पण विधानसभेत गमावलं ! काँग्रेसचं नेमकं काय चुकलं? )

मित्रपक्षांशी समन्यवय

भाजपानं विधानसभा निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्रपक्षांच्या मदतीनं निवडणूक लढवली. जागा वाटपाचा प्रश्न सोडवण्यात फडणवीसांची भूमिका महत्त्वाची ठरली. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत कायम होता. अगदी निवडणुकीच्या दिवशी सुशील कुमार शिंदेंसारख्या ज्येष्ठ नेत्यानं सहकारी पक्षाच्या विरोधात उघड भूमिका घेतली. महायुतीमध्ये हे प्रकार कमी करण्यात फडणवीसांचा मोठा वाटा होता. त्याचा भाजपासह महायुतीलाही फायदा झाला. 

Advertisement

जरांगे फॅक्टरवर मात 

मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षण आंदोलन हे देवेंद्र फडणवीसांच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा मानलं जात होतं. त्या आंदोलनाचा फटका लोकसभेत भाजपाला बसला. पण, विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरवर मात करण्यासाठी भाजपाची रणनीती यशस्वी झाली. जरांगे फॅक्टरवर मात करणारी रणनीती आखण्यात फडणवीस आघाडीवर होते. भाजपाचं आक्रमक हिंदुत्व आणि 'एक है तो सेफ है' ही घोषणा निर्णायक ठरली.

( नक्की वाचा : रात्र थोडी, नाराजी फार! भाजपामधील असंतुष्टांना शांत करण्याचा काय आहे 'फडणवीस पॅटर्न'? )
 

पुढे काय होणार?

लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकणं हा भाजपासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला होता. देशातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं राज्य महायुतीनं दणदणीत बहुमतासह जिंकलं आहे. भाजपाचं संख्याबळ देखील वाढलंय. त्यामुळे फडणवीसांचं राज्यात आणि केंद्रात वजन वाढणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचं नाव आघाडीवर आहे. 

Advertisement

देवेंद्र फडणवीसांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकींपूर्वी झालेल्या शेवटच्या विधीमंडळ अधिवेशनात केलेल्या भाषणातील काही ओळी प्रचंड गाजल्या होत्या. त्या ओळी अनेकांना आठवत आहे. त्या ओळी आहेत.

मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन! याच निर्धाराने,
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी
मी पुन्हा येईन!
गावांना जलयुक्त करण्यासाठी
शहरांचा चेहरा बदलण्यासाठी
माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी 
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी
मी पुन्हा येईन!
युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी
बळीराजाला बळकट करण्यासाठी
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...
मी पुन्हा येईन!
मी पुन्हा येईन....
याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी
प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हाती घेत
माझ्या महाराष्ट्राला एक नवं रुप देण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...
मी पुन्हा येईन....