
Maharashtra Election Result 2024 Update : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीत थेट लढत झाली. त्यामध्ये महायुतीनं बाजी मारलीय. महायुतीमधील भारतीय जनता पार्टीनं सलग तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत सेंच्युरी पूर्ण केली आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीमधील काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झालीय.
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात सर्वाधिक 13 जागा जिंकल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल, असा दावा त्यांचे नेते आणि कार्यकर्ते करत होते. पण, लोकसभेत दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसचं विधानसभा निवडणुकीत काय चुकलं? हा प्रश्न सर्वांनाच पडलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मतदारसंघातच अडकले नेते
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे महायुतीचे प्रमुख नेते राज्यभर महायुतीचा प्रचार करत होते. महाविकास आघाडीतीलही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राज्यभर प्रचारसभा घेतल्या. पण, काँग्रेसचा एकही प्रादेशिक नेता राज्यभर प्रचार करताना फारसा दिसला नाही. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, अमित देशमुख हे प्रदेश काँग्रेसमधील नेते आपआपल्याच मतदारसंघ आणि विभागातच अडकले. काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यभर प्रचार केला नाही, त्याचा फटका पक्षाला विधानसभा निवडणुकीत बसला.
राहुल गांधी फॅक्टर फेल
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढण्याचं श्रेय पक्षानं परंपरेनुसार काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलं. विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांची जादू विधानसभा निवडणुकीत दिसली नाही. राहुल गांधी यांनी स्थानिक मुद्दे सोडून भलत्याच मुद्यांवर सत्तारुढ महायुतीला लक्ष केलं. संविधान बदलण्याचा राहुल गांधींचा नरेटीव्ह लोकसभा निवडणुकीत चालला. पण, विधानसभा निवडणुकीत त्याला मतदारांनी दाद दिली नाही, हे निकालात स्पष्ट झालं.
( नक्की वाचा : Maharashtra Election Result : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी राजभवनात होणार नाही? )
जागवाटपातील घोळ भोवला
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा फायदा काँग्रेसला जागावाटपात उचलता आला नाही. काँग्रेसनं राज्यात फक्त 101 जागा लढल्या. त्या उलट लोकसभेत फटका बसूनही भारतीय जनता पार्टीनं 149 जागांवर विधानसभा निवडणूक लढवली.
जागावाटपात राज्यातील काँग्रेसचे नेते हक्काच्या जागांसाठी अडून राहिले नाहीत. पक्षासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या नाना पटोलेंना ठाकरे गटाच्या दबावामुळे चर्चेतून हटवण्यात आलं. त्यामुळे जागा वाटपाबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शेवटपर्यंत संभ्रम होता. जागवाटपातील घोळ तसंच पडती बाजू घेणं पक्षाला भोवलं. जागा वाटपाच्या चर्चेतून नाना पटोलेंना हटवल्यानं विदर्भातील कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला.
( नक्की वाचा : Maharashtra Election Result 2024 : राज ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई, अन्यथा होईल मोठी नामुश्की )
मुस्लीम व्होटबँक दुरावली !
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या यशात मुस्लीम मतदारांचा मोठा वाटा होता. त्यानंतरच भाजपानं 'व्होट जिहाद' हा मुद्दा उचलला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ठरवून मतदान करणाऱ्या मुस्लीम मतदारांनी यंदा पंजाला पूर्ण साथ दिली नाही, हे निवडणूक निकालावरुन स्पष्ट झालंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world