Maharashtra Election Result 2024 : राज ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई, अन्यथा होईल मोठी नामुश्की

Maharashtra Election Result 2024 : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Maharashtra Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (मंगळवार, 23 नोव्हेंबर) रोजी लागणार आहेत. सत्तारुढ महायुती आणि विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये यंदा प्रमुख लढत होत आहे. दोन्ही आघाडींनी राज्यात विजयाचे दावे केले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष देखील निवडणूक रिंगणात आहेत. तसंच काही मतदारसंघात बंडखोर उमेदवार देखील निर्णायक ठरणार आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कशी होती मनसेची कामगिरी?

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सत्ता स्थापनेची चुरस आहे. त्याचवेळी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं दमदार सुरुवात केली होती. त्या निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. पण नंतरच्या दोन विधानसभा निवडणुकीत मनसेची कामगिरी घसरली.

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला 12 जागांचा फटका बसला. त्या निवडणुकीत मनसेचा फक्त 1 आमदार निवडून आला होता. मागील निवडणुकीतही त्यांची कामगिरी जैसे-थे होती. या निवडणुकीत मनसेला फक्त कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात विजय मिळवता आला. राजू पाटील त्या मतदारसंघातून निवडून आले होते. 

( नक्की वाचा : Maharashtra Election Result 2024 : कधी, कुठे पाहणार निकाल? महत्त्वाचे मतदारसंघ, वाचा सर्व माहिती )
 

यंदा अस्तित्वाची लढाई

यंदा झालेली विधानसभा निवडणूक मनसेसाठी अस्तित्वाची लढाई आहे. मान्यता टिकविण्यासाठी मनसेला या निवडणुकीत किमान तीन आमदार आणि तीन टक्के मतांची गरज आहे. 123 जागा लढणाऱ्या मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यास एकूण मतदानाच्या आठ टक्के मतं मिळवावी लागतील. मनसेला ही अट पूर्ण करता आली नाही तर अधिकृत पक्ष म्हणून मनसेची मान्यता धोक्यात येईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Advertisement

काय होती मनसेची भूमिका?

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेनं विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीत जोरदार प्रचार केला. राज यांनी राज्यभर मनसेच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतल्या. या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना प्रामु्ख्यानं लक्ष केलं. तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरही टीका केली. भारतीय जनता पार्टीवर फारशी टीका करणे राज यांनी टाळले होते.