साधूंचं हत्याकांड झालं त्या गावाकडे राजकारण्यांची पाठ का?

साधू हत्याकांड झालेल्या गडचिंचले गावाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. पण ही चर्चा साधू हत्याकांडाची नाही तर इथल्या गावाला मिळणाऱ्या सोयी सुविधींची आहे.

Advertisement
Read Time: 4 mins
पालघर:

मनोज सातवी 

पालघरच्या साधू हत्याकांड प्रकरणाला चार वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. या साधू हत्याकांड प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या. या चार वर्षात पुलाखालून बरच पाणी निघून गेलं आहे. साधू हत्याकांड झालेल्या या गडचिंचले गावाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. पण ही चर्चा साधू हत्याकांडाची नाही तर इथल्या गावाला मिळणाऱ्या सोयी सुविधींची आहे. खरोखरच यागावाला काही मिळालं का? की त्या घटनेनंतर हे गाव महाराष्ट्रात असूनही वाळीत टाकलं गेलं अशीच चर्चा सध्या इथे सुरू आहे. यागावाची काय स्थिती आहे हे जाणून घेणारा हा रिपोर्ट.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गाव झालं दुर्लक्षित 

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा २० तारखेला पार पडत आहे. मात्र या निवडणुकीच्या प्रचारात गडचिंचले येथील साधू हत्याकांडाचा मुद्दा कळीचा ठरला आहे. साधू हत्याकांडानंतर गडचिंचले गावचे नाव राज्याच्या नव्हे तर देशाच्या नकाशावर चर्चेला गेला. ही दुर्घटना घडल्यानंतर जवळपास दोन वर्ष या गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. शिवाय गावाचं नाव कुप्रसिद्ध झाल्याने, या ठिकाणी शासकीय सेवा सुविधांची वानवा निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि दिव दमणला जोडणारा कासा - सायवन - उधवा हा राज्यमार्ग याच गावातून जातो. मात्र या गावात येणारी एसटी बस तेव्हापासून बंद झाली ती कायमचीच. बससाठी येथील शाळकरी मुलं आणि इतर नागरिकांना तीन किलोमीटर अंतरावरील दाभाडी येथे  जावं लागतं. येथील नागरिकांना रोजगार नाही, पिण्यासाठी मुबलक पाणी नाही. विशेष म्हणजे जिल्हाभर प्रचाराचा धुरळा उडाला असताना या गावात एकही राजकारणी किंवा कोणत्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते फिरकलेले नाहीत असे येथील माजी सरपंच आणि स्थानिक नागरिक सांगतात. 

Advertisement

हेही वाचा - पाचव्या टप्प्यासाठी प्रचार थंडावणार, मात्र मोदी- ठाकरेंच्या सभांनंतर वातावरण तापलं

हत्याकांडाचे अजूनही सावट 

या गावात सध्या शांतता असली तरी गावातील कुणीही व्यक्ती साधू हत्याकांडा बद्दल बोलयला तयार होत नाही. गडचिंचले आणि आजूबाजूच्या चौकी पाडा, हेद पाडा, साठे पाडा, चोल्हेर, पाटील पाडा, भूर्कुड पाडा, खडकी पाडा, शेत पाडा, अशा प्रत्येक पाड्यातील चार-पाच पुरुष हे आजही तुरुंगात आहेत. तर या प्रकरणातील तीन आरोपींचा तुरुंगात असतानाच मृत्यू झाला आहे. "साधू हत्याकांड झालं तेव्हा माझा नवरा काहीतरी घडलं म्हणून पाहण्यासाठी गेला. मात्र त्याच्या मोबाईलच्या लोकेशनमुळे त्याला फसवून तुरुंगात टाकल्याचे, मयत आरोपी रामदास  भूरकुड याची पत्नी सायकी भूरकुड म्हणते. तसेच रामदासचे काका आणि काकांची मुलं देखील तुरुंगात आहेत. नवरा गेल्यावर चार पोरांचं पालन पोषण कसं करायचं याची चिंता तिच्या डोळ्यांमध्ये आणि चेहऱ्यावर ठळकपणे दिसून येते.

Advertisement

हेही वाचा - उद्धव ठाकरे म्हणतात, "नरेंद्र मोदी 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत"

पाण्यासाठी गावाकऱ्यांची वणवण 

या गावात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय तीव्र आहे. येथील नदी नाले आटून गेले आहेत. तर, विहिरीमधील पाण्याच्या पातळीने  तळ गाठला आहे. त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. रोजगाराच्या नावाने तर गावात बोंब आहे. रोजगारासाठी आज ही मुंबई ठाणे हाच पर्याय इथल्या तरुणांसमोर आहे. देशात मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण तापले आहे. परंतु राजकारण सोडून इतर सेवा सुविधा मिळाव्यात अशी येथील नागरिकांची मागणी आहे. पण राजकारणा वेळी गावाच वापर जोरात झाला. गल्ली पासून दिल्ली पर्यंत गाव पोहचलं. पण त्यानंतर गावात सोई सुविधा काही पोहचल्या नाहीत. हत्याकांड झालं त्यात गावाची चुक काय असा प्रश्न दबक्या आवाजत विचारला जातोय.  

Advertisement

हेही वाचा - मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवे दीड तासासाठी बंद राहाणार, 'हा' आहे पर्यायी मार्ग

हत्याकांडाचा तो दिवस 

पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ 16 एप्रिल 2020 रोजी साधूंचे हत्याकांड झालं होतं.  मुलं चोरणारे चोर असल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी गस्त घालणाऱ्या गावकऱ्यांकडून गुजरातमधील सुरत येथे अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निघृणपणे दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी ग्रुप ग्रामपंचायतीमधील दिवशी, गडचिंचले, दाभाडी या गावपाड्यांमधील एकूण 225 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी 47 आरोपींचा जामीन विशेष न्यायालयाने नाकारला असून यातील तीन आरोपींचा तुरुंगातच मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 178 जणांना जामीन मिळाला आहे. सध्या हे प्रकरण ठाणे येथील विशेष मॉब लिंचिंग कोर्टात प्रलंबित आहे.