- महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येत असून सर्व पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे
- जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विष्णू भंगाळे यांना मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं
- तुकाराम वाडी परिसरातील मतदारांनी विकासकामे व पाणी पुरवठा याबाबत नाराजी व्यक्त केली.
मंगेश जोशी
महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसा प्रचारात ही रंग भरत आहेत. सर्वच पक्षाचे उमेदवार सध्या घरोघरी जावून प्रचार करत आहेत. प्रत्येक मतदाराला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचासाठी प्रचार रॅली काढल्या जात आहेत. गल्लोगल्ली प्रचार फेऱ्या सध्या दिसत आहेत. काही ठिकाणी उमेदवारांचे स्वागत होत आहे. तर काही ठिकाणी मात्र मतदारांच्या रोषाला उमेदवारांना समोरे जावे लागत आहे. असा एक प्रकार जळगावमध्ये घडला आहे. इथं मत मागण्यासाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला मतदारांनी अक्षरश: पिटाळून लागवे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जळगाव शहरातील तुकाराम वाडी परिसरात ही घटना घडली आहे. या वार्डमध्ये शिवसेना शिंदे गटाने विष्णू भंगाळे यांना उमेदवारी दिली आहे. ते महायुतीचे उमेदवार आहे. विशेष म्हणजे भंगाळे हे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ही आहेत. ते तुकारामवाडीत प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. विष्णू भंगाळे हे प्रभाग क्रमांक 5 मधून महायुतीचे उमेदवार आहेत. तिथेच त्यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. कार्यकर्त्यांसह भंगाळे तुकारामवाडीत पोहचले. पण त्यांनी अपेक्षा ही केली नसेल असा प्रकार तिथे घडला.
तुकाराम वाडी परिसरात मतदारांना मत मागण्यासाठी कार्यकर्त्यांसमवेत गेले असता त्यांना तिथल्या नागरिकांनी घेरले. शिवाय थेट जाब विचारला. तुम्ही मतं मागायला आलात तुकारामवाडीसाठी काय केलं सांगा? असा प्रश्न एका महिलेने विचारला. विकासकामे, पाणी, रस्ते, स्वच्छता या सारख्या प्रलंबित प्रश्नांवर त्या महिनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. उमेदवाराने आपण इथं रस्ता केला. हा रस्ता कुणी केलाय. गटारं कुणी केलीत असं सांगण्याचा प्रयत्न केला. तसं त्या व्हिडीओत ही दिसत आहे. पण नागरिक त्यांचे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.
यातून शाब्दीक चकमक ही झाली. संतप्त मतदारांनी थेट उमेदवाराला शिवागाळ केली. आक्रमक मतदार पाहात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथून काढता पाय घेण्यातच धन्य मानलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रचारादरम्यान मतदारांमधील वाढत असंतोष चर्चेचा विषय ठरत आहे. जळगाव शहरात ही हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. जळगाव महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world