जाहिरात

Ajit Pawar : 'शेंबड्या बाब्याला नेता करा'...NCP जिल्हाध्यक्षांचं अजित पवारांना खळबळजनक पत्र, वाचा जसंच्या तसं

Jalgaon NCP Crisis: जळगवामध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक शांताराम पाटील यांनी एक खळबळजनक पत्र लिहिलं आहे.

Ajit Pawar : 'शेंबड्या बाब्याला नेता करा'...NCP जिल्हाध्यक्षांचं अजित पवारांना खळबळजनक पत्र, वाचा जसंच्या तसं
Jalgaon NCP Crisis: अभिषेक पाटील यांनी राजीनामा देताना अजित पवारांना उद्देशून एक खळबळजनक पत्र लिहलं आहे.
जळगाव:

मंगेश जोशी, प्रतिनिधी

Jalgaon NCP Crisis:  राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरुन सर्व पक्षात नाराजीचा स्फोट झाला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला. अन्य पक्षांचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही.  जळगवामध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. 

पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक शांताराम पाटील यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देताना अजित पवारांना उद्देशून एक खळबळजनक पत्र लिहलं आहे. ते पत्र व्हायरल झालं असून त्यामुळे राष्ट्रवादीमधील असंतोष उघड झाला आहे. 

गंभीर आरोपांची सरबत्ती आणि राजीनामा

अभिषेक पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपले सविस्तर राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये त्यांनी पक्षातील जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. 

पक्षातील अंतर्गत लोकशाही पूर्णपणे संपली असून केवळ काही ठराविक नेत्यांच्या स्वार्थासाठी पक्ष चालवला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सामान्य आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सातत्याने डावलले जात असून, त्यांचा अपमान केला जात असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

(नक्की वाचा : Nashik-Solapur : नाशिक ते सोलापूर आता 'बुलेट' वेगाने; मोदी सरकारचा महाप्रकल्प, वाचा सर्व माहिती ! )
 

महापालिका निवडणुकीत उमेदवारीचा सौदा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि उमेदवारीवरून सुरू असलेल्या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अभिषेक पाटील यांनी केला आहे. महानगराध्यक्ष म्हणून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे अधिकार त्यांच्याकडे असतानाही, त्यांच्या स्वाक्षरीशिवाय नियमबाह्य पद्धतीने निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

इतकेच नाही तर, राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या जागांचा सौदा चक्क भाजपच्या उमेदवारांना करण्यासाठी झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. आर्थिक फायद्यासाठी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावली जात असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले.

( नक्की वाचा : Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवलीत 'महायुती'चा धमाका! उमेदवारांच्या यादीत कुणाचं नाव? वाचा संपूर्ण यादी )

'शेंबड्या बाब्याला नेता करण्यासाठी कार्यकर्त्यांचा वापर'

पाटील यांनी आपला संताप व्यक्त करताना नेत्यांच्या घराणेशाहीवरही प्रहार केला आहे. माजी मंत्र्यांच्या शेंबड्या बाब्याला नेता करण्यासाठी आयुष्यभर पक्षासाठी झटणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना केवळ पाणी भरण्यासाठी वापरले जात असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. 

स्वार्थासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी जिल्हयातील काही नेते प्रामाणिक कार्यकर्त्यांची गळचेपी करत असून, हा राजीनामा रागातून नसून केवळ आत्मसन्मानासाठी दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


वाचा अभिषेक पाटील यांचे खळबळजनक पत्रं जसंच्या तसं

प्रति,
श्री. अजितदादा पवार
अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

विषय :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा व प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा.

महोदय,
आपण स्पष्टवक्ता, निर्णयक्षम आणि कणखर भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जाता. सामान्य कार्यकर्त्याला आपले नेतृत्व धैर्य देणारे, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद देणारे वाटत आले आहे. त्यामुळेच आपल्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, कदाचित आता होता असे म्हणावे लागेल, ही खंत मनात दाटून येते.

जळगाव शहर व जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व आपण ज्यांच्याकडे सोपवले आहे, त्यांनी अलीकडील महापालिका निवडणुकीतील जागावाटपातून पुन्हा एकदा स्वतःचा खरा चेहरा दाखवून दिला आहे. स्वार्थासाठी पक्षाची इभ्रत पणाला लावली आहे, मिळालेल्या जागांचा सौदा केला आणि त्यातून स्वतः मोकळे झाले.

आमच्या शेंबड्या बाब्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनो तुम्ही पाणी भरा

या न्यायाने, माजी मंत्री व पक्षाच्या प्रमुख नेत्याने स्वतःच्या मुलासाठी एक जागा राखून ठेवली. ज्याला राजकारणात वा समाजकारणात काडीचीही रुची नाही. उरलेल्या जागांवर घड्याळाच्या चिन्हाखाली भाजपचे चेहरे निवडणूक लढवणार आहेत. ही वस्तुस्थिती आता लपून राहिलेली नाही. हे योग्य की अयोग्य, चांगले की वाईट याचा निकाल आपणच द्यावा.

Latest and Breaking News on NDTV


या साऱ्या प्रक्रियेत पक्षाला काय मिळाले? हा प्रश्न जितका साधा आहे तितकाच महत्वाचा आहे. आणि कार्यकर्त्यांना काय मिळेल, हे तर सांगायलाच नको. वर्षानुवर्षे झेंडे उचलणारे, वेळ-श्रम-पैसा खर्च करणारे, कायम घरच्यांची नाराजी सहन करून बोलणी खाणारे प्रामाणिक कार्यकर्ते त्यांच्या वाट्याला सन्मानाऐवजी अपमान, आणि न्यायाऐवजी समजूतदारपणाच्या नावाखाली शांत बसण्याचा सल्ला मिळत आहे.

या अश्या भंकस नेतृत्वाखाली जळगाव शहर व जिल्ह्यात पक्ष कसा सांभाळला जाईल आणि पुढे कसा नेला जाईल? या प्रश्नाचे उत्तर मला आपल्याकडून अपेक्षित आहे.

Latest and Breaking News on NDTV

खर सांगायचं झाल तर आपण दिलेल्या जबदारीनुसार मी जळगाव शहराचा महानगराध्यक्ष आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे एबी फॉर्म महानगराध्यक्ष या जबाबदारीने माझ्याकडे दिले पाहिजे होते व माझ्या सहीशिवाय ते ग्राह्य धरले जायला नको होते. हे पदाच्या अधिकाराचे उल्लंघन नाही का? आणि अपमान सुद्धा. पक्ष विचारांवर उभा असतो, कार्यकर्त्यांवर उभा असतो, डुप्लिकेट, स्वार्थी, लबाड लोंकवर नाही, सौद्यांवर नाही.

महोदय, माझा हा निर्णय रागातून नाही; तो वेदनेतून आहे. तुमच्या नेतृत्वावर प्रेम होते, आहे आणि राहील. पण अन्यायावर डोळे झाकून उभे राहणे मला जमणार नाही. म्हणूनच, आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारा, प्रेम करणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा व प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा देत आहे.

हा राजीनामा विरोधाचा नाही, तर आत्मसन्मानाचा आहे. कदाचित हा आवाज किरकोळ वाटेल; पण तो अनेक न बोललेल्या कार्यकर्त्यांच्या मनातील अस्वस्थतेचा प्रतिध्वनी आहे, एवढी नम्र नोंद घ्यावी.
आपण योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा.
आपलाच,
अभिषेक शांताराम पाटील
(प्रामाणिक कार्यकर्ता)
लोभ असावा, प्रेम कायम आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com