आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मोठ्या प्रमाणात जागा लढवेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. आपण आकडा सांगणार नाही, कारण पुन्हा त्यावर चर्चा होईल असं स्पष्ट केलं. त्यामुळे आगामी विधानसभेच्या महाविकास आघाडीतील जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील,असा विश्वासच जयंत पाटलांनी व्यक्त केला. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
सगळे होते, त्यावेळी चार खासदार निवडून आले होते. आता जवळपास सगळे कमी झाले. त्यामुळे चार-पाच होतील असं वाटलं होतं. पण हळूहळू मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर 8 झाले, असं जयंत पाटलांनी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अप्रत्यक्ष टोला लगावला. हातकणंगले मतदारसंघात थोडं दुर्लक्ष झालं, त्यामुळे फटका बसला. पण या मतदारसंघात धनशक्तीचा विजय झालाय. मात्र जनशक्ती ही सत्यजित पाटलांच्या सोबतच आहे, असे देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केलं.
नक्की वाचा - 'मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही...' रोहित पवारांचा अजितदादांना टोला
सांगली जिल्ह्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तीन जागा लढवणार आहे. मात्र आणखी एक दुसरी जागा मिळवायची आहे, असं देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केले आहे. मात्र सांगली जिल्ह्यातली कोणत्या विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा सांगणार हे गुलदस्त्यात ठेवल्यानं काँग्रेसची धाकधूक वाढणार आहे. सांगली लोकसभेच्या जागा वाटपामध्ये आपला काहीच संबंध नव्हता, मात्र आपल्याबद्दल गैरसमज पसरला,असे जयंत पाटलांनी स्पष्ट करत कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसने घेतल्याने शिवसेनेने सांगलीची काँग्रेसची जागा घेतली,असे जाहीरपणे सांगितले.
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील आजचे चित्र बदलून टाकण्यासाठी भ्रष्टाचाराला बाजूला करून महायुतीचे सरकार घालवूया, असे आवाहन देखील यावेळी जयंत पाटील यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world