गोळी झाडणाऱ्या भाजप आमदारा विरोधात शिंदेंच्या शिलेदाराने दंड थोपटले

या मतदार संघात भाजपने गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली तर आपण अपक्ष निवडणूक लढविणार असा इशारा कल्याण पूर्व शिवसेना शिंदे गटचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी दिला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
कल्याण:

अमजद खान 

महायुतीत एकीकडे जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना दुसरीकडे अनेक मतदार संघात स्थानिक पातळीवर मात्र युतीत बिघाडी होताना दिसत आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातही भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गटात वाद निर्माण झाला आहे. या मतदार संघात भाजपने गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी दिली तर आपण अपक्ष  निवडणूक लढविणार असा इशारा कल्याण पूर्व शिवसेना शिंदे गटचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी दिला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड हे सध्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी तळोजा जेलमध्ये बंद आहेत. त्यामुळे या मतदार संघात महायुतीतील वाद टोकाला गेला आहे. त्यामुळे पेच निर्माण होवू शकतो. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची असं कोडं भाजप समोर आहे.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडी  सुरू आहे. भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात होते. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांचावर आणि त्यांच्या साथीदारांवर उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला. याप्रकरणी गणपत गायकवाडांसह त्यांचे सुरक्षा रक्षक, त्यांच्या मुलगा, त्यांचे व्यावसायिक पार्टनर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय त्यांना अटक केली होती. 

ट्रेंडिंग बातमी - दाऊदबरोबर संबंध असल्याचा आरोप,नंतर जेलवारी, आता लेकीसह बापालाही उमेदवारी

या गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड हे सध्या जेलमध्ये आहेत. त्यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपाकडून विधानसभा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुलभा गायकवाड यांचाकडून कल्याण पूर्व मतदार संघात ठिकठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण करण्यात आले होते. सुलभा गायकवाड या विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवार असू शकतात असे संकेत भाजपकडून देण्यात आले आहे.

ट्रेंडिंग बातमी - नवनीत राणांनंतर रवी राणांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध, पुन्हा खेला होणार?

मात्र हे सर्व सुरू असताना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर  शिवसेना शिंदे गटाचे महेश गायकवाड हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट बंडखोरीची भाषा केली आहे. ज्यामुळे महायुतीत पेच निर्माण होऊ शकतो. कल्याण पूर्व शहराला ज्या व्यक्तीने भकास करून ठेवले आहे, त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना परत भाजपाकडून उमेदवारी दिली जावू नये. जर त्यांना उमेदवारी दिली जात असेल तर  अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे महेश गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.  

ट्रेंडिंग बातमी - तळकोकणात राणेंना धक्का, तर शिंदे सेनेचे टेन्शन वाढणार? ठाकरेंच्या गळाला बडा नेता

कल्याण पूर्वची परिस्थिती अतिशय खराब आहे. ट्राफिकची समस्या, पाण्याची समस्या, एक ही शासकीय हॉस्पिटल नाही असेही महेश गायकवाड म्हणाले. अतिशय बकाल अवस्था या शहराची झाली आहे. भ्रष्टाचारी व्यक्तीला आता कल्याण पूर्वची जनता थारा देणार नाही. कल्याण पूर्वतील या परिस्थितीला फक्त एकच व्यक्ती जबाबदार आहे. त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली तर हे शहर असेच बकाल राहील. त्यामुळे आपण थेट भूमीका घेतल्याचे ते म्हणाले. महेश गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. त्यामुळे ते बंडखोरी करणार की महायुतीचा धर्म पाळणार हे पहावे लागणार आहे.