विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठे उलटफेर होताना दिसत होते. काल पर्यंत एका पक्षात असलेले नेते दुसऱ्या दिवशी भलत्याच पक्षात जाताना दिसत आहेत. सध्या पक्ष बदलण्याचा हंगाम सुरू आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यात आता तळकोकणात उद्धव ठाकरे यांनी भाजप, राणे यांना जोरदार धक्का देत बडा नेता आपल्याकडे ओढला आहे. त्यामुळे शिंदेंच्या सेनेचे टेन्शन मात्र वाढले आहे. या नेत्याच्या प्रवेशाने तळकोकणातील राजकीय गणित बदलण्याची दाट शक्यता आहे. हा नेता आज शुक्रवारी मातोश्रीवर प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांची चांगली ताकद आहे. त्यामुळे भाजपलाही बळ मिळालं आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी विधानसभा मतदार संघात सध्या शिंदेंच्या सेनेचे दीपक केसरकर हे विद्यमान आमदार आहे. शिवाय ते मंत्री ही आहेत. अशा वेळी ही जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाला मिळणार हे जवळपास निश्चित आहे. याच मतदार संघात भाजपनेते राजन तेली गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत. त्यांनी या मतदार संघात भाजपची संघटना वाढवली. कार्यकर्त्यांचे एक जाळे उभे केले. दोन निवडणुकीत त्यांनी दीपक केसरकर यांना कडवी झुंज दिली. शिवाय केसरकर हे तीन वेळा निवडून आले आहेत.
त्यांच्या विरोधात सध्या मतदार संघात वातावरण आहे. अशा वेळी उमेदवारी आपल्यालाच मिळावी अशी इच्छा राजन तेली यांची होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास निश्चित आहे. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील. राजन तेली हे मुळचे शिवसैनिक आहेत. नारायण राणे यांच्या बंडानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राणेंच्या अत्यंत जवळचे म्हणून राजन तेली यांची ओळख होती. राणेंचे राजकीय प्रस्थ सिंधुदुर्गात तेच समजत होते. पण काही कारणाने या दोघांमध्ये बिनसले. राजन तेली यांनी वेगळी वाट धरत राणेंच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी सावंतवाडीत आपलं बस्तान बसवलं आहे.
राणे हे सध्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे तेली यांनी पक्ष सोडणे हा राणे यांच्यासाठी ही धक्का समजला जातो. राणे यांच्या पेक्षा तेली यांनी आपली ताकद सावंतवाडीमध्ये वाढवली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राणे यांना सावंतवाडीतून निर्णायक आघाडी मिळाली होती. त्यावेळी केसरकर आणि राजन तेली यांनी मिळून राणेंचा प्रचार केला होता. मात्र आता तेली यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेंडिंग बातमी - मोबाइलवर मालिका पाहू नको, आईने लेकाला हटकले, लेकाने भयंकर कृत्य केले
राजन तेली यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यास शिंदे गटाचे टेन्शन वाढणार आहे. या मतदार संघात ठाकरेंना मानणारा शिवसैनिक आहे. तो तेली यांच्या मदतीला येणार आहे. त्यामुळे तेली यांचे बळ वाढणार आहे. शिवाय तेली यांनी स्वत: चे कार्यकर्ते या मतदार संघात उभे केले आहेत. शिवाय भाजपमधील काही कार्यकर्त्यांचा केसरकर यांना विरोध आहे. अशा वेळी ते तेली यांना साथ देण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची लढत ही चुरशीची होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world