- माजी नगरसेवक अरुण गीध यांनी भाजप कार्यालयात जाताना गळ्यात भाजपचा पट्टा टाकल्याचा दावा केला आहे
- अरुण गीध आणि त्यांची बहिण वंदना गीध यांनी शिवसेनेत अधिकृत पक्ष प्रवेश केल्याचे जाहीर केले आहे
- भाजपने 25 ऑगस्टच्या सीसीटीव्हीमध्ये अरुण गीध यांचा पक्ष प्रवेश दाखवून दिला आहे.
अमजद खान
भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेवक अरुण गीध यांच्या पक्ष प्रवेशावरुन वाद थांबताना दिसत नाही. आता तर चक्क अरुण गीध यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप केला आहे. मी भाजप कार्यालयात गेलो असता दार बंद करुन त्यांनी माझ्या गळ्यात भाजपचा पट्टा टाकला. मी भाजपमध्ये गेलो नाही. भाजपने या प्रकरणात सीसीटीव्ही समोर आणला आहे. ज्यामध्ये अरुण गीध यांचा भाजपमध्ये प्रवेश केला जात आहे. त्यांनी एक अर्ज देखील भरताना दिसत आहे. आता खरे कोण खोटे कोण? परंतू गीध यांचा पक्ष प्रवेश भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील नेत्यांची डोकेदुखी ठरणार आहे.
कल्याण डोंबिलीत निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर सर्व पक्षीय नेते कामाला लागले आहे. महायुतीमधील दोन्ही पक्ष शिवसेना भाजप हे युती कशी करायची यावर मंथन सुरु आहे. जुने वाद विसरुन एकत्रित निवडणूक लढण्याची तयारी करीत आहे. मात्र केडीएमसीचे माजी नगरसेवक अरुण गीध व त्यांची बहिण माजी नगरसेविका वंदना गीध यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावरुन शिवसेना भाजपमध्ये जोरदार जुंपली आहे. भाजपचे नरेंद्र पवार यांनी आरोप केला की, एकमेकांचे पदाधिकारी घ्यायचे नाही. युती धर्म पाळायचा. महायुतीत निवडणूक लढायची हे ठरलं होतं असं पवार म्हणाले.
तरी ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियम तोडून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकाला शिवसेनेत घेतले. हे भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आहे. या नंतर शिवसेना शहर प्रमुख रवि पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, अरुण गीध हे भाजपच्या कार्यालयात सहज गेले होते. त्यावेळी त्यांच्या गळ्यात भाजपचा पट्टा टाकला गेला. नरेंद्र पवार हे प्रसिद्धीसाठी हे करीत आहे. हे योग्य नाही. मात्र या नंतर अरुण गीध समोर आले. त्यांनी दिलेली प्रतिक्रीया ही अधिक धक्कादायक आहे.
त्यांनी सांगितले की, मी भाजपमध्ये गेलो नाही. माझ्या कार्यालयाच्या बाजूला भाजपचे कार्यालय आहे. मी तिकडे गेलो असता भाजपचा पट्टा माझ्या गळ्यात टाकला. त्यांची बहिण माजी नगरसेविका वंदना गीध यांनी गंभीर आरोप केला आहे की, भाजप कार्यालयाचे दार बंद करुन आमच्या गळ्यात भाजपचा पट्टा टाकला गेला. आमचा अधिकृत प्रवेश शिवसेनेत झाला आहे. मात्र 25 ऑगस्टच्या एक सीसीटीव्ही भाजपकडून प्रसार माध्यमानांना दिला आहे. ते स्वखुशीने भाजपात आले होते. त्यांनी स्वत: पक्ष प्रवेश केला होता असं ही भाजपने सांगितले.