- केडीएमसीमध्ये पक्ष प्रवेशावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे.
- अरुण गीध आणि त्यांची बहिण वंदना गीध यांनी भाजप सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
- नरेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
अमजद खान
केडीएमसीत एका पक्ष प्रवेशावरुन शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. एकीकडे युतीची बोलणी करायची दुसरीकडे भाजपच्या पाठीत खंजीर खुपसायच, हे योग्य नाही, हे चुकीचे आहे असा थेट आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे. शिवाय त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केलेले अरुण गीध यांनी त्यांची बहिण वंदना गीध यांच्यासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजी आहे. हे दोघे ही भाजपमध्ये होते. एकमेकांचे कार्यकर्ते नेते आपल्या पक्षात घ्यायचे नाहीत असं ठरलं असतानाही कल्याणमध्ये मात्र हा करार तोडला गेला असा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
केडीएमसीत शिवसेना भाजपमध्ये पक्ष प्रवेशावरुन नाराजी नाट्य चांगलेच रंगले होते. त्यानंतर महायुतीतील नेते एकत्रित आले. निवडणूका जवळ येताच महायुतीची चर्चा सुरु झाली. शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार याचे संकेत मिळू लागले. कल्याण डोंबिवलीत एका कार्यक्रमात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते एकत्रित आले. हे सगळे सुरु असताना निवडणूकीची घोषणा झाली. ज्या दिवशी आचारसंहिता लागू झाली, त्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गट, बसपा आणि अन्य नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
यामध्ये अरुण गीध आणि त्यांची बहिण माजी नगरसेविका वंदना गीध यांचा समावेश होता. अरुण गीध यांच्या प्रवेशावरुन वादंग सुरु झाला आहे. भाजपकडून थेट एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेंना सवाल उपस्थित केला आहे. नरेंद्र पवार यांनी सांगितले की,25 ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक अरुण गीध यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अरुण गीध व त्यांची बहिण वंदना गीध यांना भाजपने उमेदवारी देणयाचे ठरवले होते. असं असताना मंगळवारी या दोघांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिला गेला. त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पवार पुढे म्हणाले की आमचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी युतीचे संकेत दिले. युती 100 टक्के होणार असे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी नियम मोडले. अरुण गीध यांना शिवसेनेत प्रवेश दिला. एकीकडे युतीची बोलणी करायची आणि दुसरीकडे भाजपच्या पाठीत खंजीर खुपसायचा हे योग्य नाही. ते चुकीचे आहे. खरंच युती करायची आहे की नाही या संदर्भात आम्ही पक्ष नेत्यांना माहिती दिली आहे. शिवसेनेत गीध यांना प्रवेश दिल्याने नाराजी आहे असं ही ते म्हणाले. त्यामुळे वरच्या पातळीवर युतीबाबत कितीही बोलले जात असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरूच आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world