Kalyan Dombivli Municipal Election 2026: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारांच्या संपत्तीबाबतची माहिती उघड झाली आहे. महापालिकेच्या सत्तेसाठी धडपडणारे बहुतांश उमेदवार हे कोट्याधीश असून, त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. विशेष म्हणजे राजकीय वारसा लाभलेले अनेक तरुण उमेदवारही या श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर आहेत.
कोण आहे सर्वात श्रीमंत उमेदवार?
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या या धनदांडग्या उमेदवारांमध्ये भाजपचे वरुण पाटील यांनी बाजी मारली आहे. वरुण पाटील हे यापूर्वीही नगरसेवक म्हणून कार्यरत होते आणि आता पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या मैदानात आहेत. पाटील कुटुंब आणि त्यांची स्वतःची मिळून एकूण मालमत्ता 39 कोटी 72 लाख 76 हजार 411 रुपये इतकी आहे. त्यांच्या उद्योगाचा आणि शेतीचा विस्तार मोठा असून, संपत्तीच्या यादीत ते सध्या पहिल्या क्रमांकावर आहेत.
(नक्की वाचा : Kalyan Dombivli: कल्याण-डोंबिवलीत 'महायुती'चा धमाका! उमेदवारांच्या यादीत कुणाचं नाव? वाचा संपूर्ण यादी )
केडीएमसी निवडणुकीत कोट्याधीशांची मांदियाळी
श्रीमंत उमेदवारांच्या यादीत भाजपचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. माजी नगरसेवक मंगेश गायकर यांचे सुपुत्र श्यामल गायकर हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असून त्यांच्याकडे 26 कोटी 74 लाख 69 हजार 944 रुपयांची मालमत्ता आहे. तर बिनविरोध निवडून आलेले भाजपचे महेश पाटील यांच्याकडे पत्नीसह 26 कोटी 36 लाख 47 हजार 609 रुपयांची संपत्ती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक विक्रांत शिंदे हे देखील या स्पर्धेत मागे नाहीत. त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता 17 कोटी 85 लाख 42 हजार 779 रुपये इतकी आहे.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमा पवार यांनी देखील आपली संपत्ती जाहीर केली असून, ती 15 कोटी 29 लाख 29 हजार 290 रुपये आहे. सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंकडील उमेदवारांकडे असलेल्या या प्रचंड संपत्तीमुळे ही निवडणूक खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेची आणि हायप्रोफाईल ठरत आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुण्याचा कारभारी कोण? 165 जागा, 1165 उमेदवार; वाचा प्रत्येक वॉर्डातील हायव्होल्टेज लढती! )
शिवसेनेचे उमेदवारही श्रीमंतीत पुढे
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनीही आपली श्रीमंती प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केली आहे. बिनविरोध निवडून आलेल्या ज्योती मराठे या 13 कोटी 51 लाख 44 हजार 468 रुपयांच्या मालकीण आहेत, तर त्यांचा मुलगा सूरज मराठे यांच्याकडे 1 कोटी 83 लाख 89 हजार 341 रुपयांची संपत्ती आहे.
याच पक्षाचे सचिन पोटे यांच्याकडे 12 कोटी 49 लाख 4 हजार 214 रुपये तर मल्लेश शेट्टी यांच्याकडे 10 कोटी 36 लाख 42 हजार 941 रुपयांची मालमत्ता आहे. विशेष म्हणजे निलेश शिंदे यांनी 8 कोटी 59 लाख 76 हजार 733 रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे.
राजकीय वारसदार आणि त्यांची मालमत्ता
या निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या मुलांनीही मोठ्या प्रमाणात नशीब आजमावले आहे. मल्लेश शेट्टी यांचे चिरंजीव हरमेश शेट्टी पहिल्यांदाच रिंगणात असून त्यांनी आपली संपत्ती केवळ 1 लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. दुसरीकडे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचे चिरंजीव हर्षल मोरे हे बिनविरोध निवडून आले असून त्यांच्याकडे 52 लाख 14 हजार 322 रुपयांची संपत्ती आहे.
भाजपचे राहुल दामले 12 कोटी 14 लाख 68 हजार 604 रुपये, जयेश म्हात्रे 7 कोटी 3 लाख 32 हजार 722 रुपये आणि दीपेश म्हात्रे 6 कोटी 33 लाख 88 हजार 766 रुपयांच्या संपत्तीसह मैदानात आहेत. शिंदे सेनेचे विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे या पती-पत्नी उमेदवारांनी आपली एकत्रित संपत्ती 4 कोटी 47 लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. या सर्व आकड्यांवरून कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात धनशक्तीचा प्रभाव किती मोठा आहे, हे स्पष्ट होत आहे.
- वरुण पाटील - भाजप - 39 कोटी 72 लाख 76 हजार 411 रुपये
- श्यामल गायकर - भाजप - 26 कोटी 74 लाख 69 हजार 944 रुपये
- महेश पाटील - भाजप - 26 कोटी 36 लाख 47 हजार 609 रुपये (बिनविरोध विजयी)
- विक्रांत शिंदे - राष्ट्रवादी काँग्रेस - 17 कोटी 85 लाख 42 हजार 779 रुपये
- हेमा पवार - भाजप - 15 कोटी 29 लाख 29 हजार 290 रुपये
- ज्योती मराठे - शिवसेना (शिंदे गट) - 13 कोटी 51 लाख 44 हजार 468 रुपये (बिनविरोध विजयी)
- सचिन पोटे - शिवसेना (शिंदे गट) - 12 कोटी 49 लाख 4 हजार 214 रुपये
- राहुल दामले - भाजप - 12 कोटी 14 लाख 68 हजार 604 रुपये
- मल्लेश शेट्टी - शिवसेना (शिंदे गट) - 10 कोटी 36 लाख 42 हजार 941 रुपये
- निलेश शिंदे - शिवसेना (शिंदे गट) - 8 कोटी 59 लाख 76 हजार 733 रुपये
- जयेश म्हात्रे - भाजप - 7 कोटी 3 लाख 32 हजार 722 रुपये (बिनविरोध विजयी)
- दीपेश म्हात्रे - भाजप - 6 कोटी 33 लाख 88 हजार 766 रुपये (बिनविरोध विजयी)
- विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे - शिवसेना (शिंदे गट) - 4 कोटी 47 लाख रुपये
- सूरज मराठे - शिवसेना (शिंदे गट) - 1 कोटी 83 लाख 89 हजार 341 रुपये
- हर्षल मोरे - शिवसेना (शिंदे गट) - 52 लाख 14 हजार 322 रुपये (बिनविरोध विजयी)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world