KDMC Election Result 2026: मनसेनं केडीएमसीत शिंदेंना दिलेल्या पाठिंब्याचं 'राज' काय? वाचा इनसाइड स्टोरी

KDMC Election Result 2026: मनसेच्या शिंदेंना दिलेल्या पाठिंब्यावरून आरोप प्रत्यारोप होत असले तरी मनसेच्या पाठिंब्यामागची इनसाइड स्टोरी वेगळीच आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
"KDMC Election Result 2026: केडीएमसीमध्ये राज ठाकरेंचा शिंदेंना पाठिंबा, मोठा ट्वीस्ट"

- विनोद तळेकर

KDMC Election Result 2026: कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणं ही मनसेची राजकीय खेळी नसून ती मनसेची हतबलता असल्याची बाब उघड झालीय. मनसेच्या पाठिंब्यामागची इनसाइड स्टोरी एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलीय. पाच नगरसेवक असलेल्या मनसेने कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि ठाकरे गट नाराज झाला. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली. पण मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला नसता तर मनसेचे चार नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले असते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेच्या पाच नगरसेवकांपैकी चार नगरसेवक हे शिंदेंचे समर्थक आहेत. भाजपसोबत जागा वाटपात या चार समर्थकांचे वॉर्ड्स भाजपला सुटल्याने श्रीकांत शिंदे यांच्या या नगरसेवकांनी मनसेकडून निवडणूक लढवली.

नामुष्की टाळण्यासाठी नाईलाजास्तव मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा 

असंही कळतंय की, मनसेच्या या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा संपूर्ण खर्च शिंदेंच्या शिवसेनेने केला. त्यामुळे निवडून आल्यानंतर हे चारही नगरसेवक मनसेचे स्थानिक नेते माजी आमदार राजू पाटील यांच्या भेटीसाठी जाण्यापूर्वी श्रीकांत शिंदेंच्या भेटीला गेले होते. अशा परिस्थितीत मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहिर केला नसता तर हे चारही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार होते, असंही कळतंय. त्यामुळे नामुष्की टाळण्यासाठी नाईलाजास्तव मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे शिंदेंना पाठिंबा देण्याचा हा निर्णय स्थानिक नेतृत्वाचा निर्णय असल्याचं जरी मनसेच्या वतीने सांगण्यात आलं असलं तरी राज ठाकरेंना या संपूर्ण घटनाक्रमाबाबत कल्पना होती, अशीही माहिती शिंदेंच्या शिवसेनेतल्या एका बड्या नेत्याने दिली. स्थानिक नेतृत्वाचा निर्णय असं जरी मनसेच्या वतीने सांगण्यात आलं असलं तरी राज ठाकरेंना संपूर्ण घटनाक्रमाबाबत कल्पना होती.

(नक्की वाचा: Mumbai BMC Mayor Reservation Lottery: मुंबई महापौर आरक्षण सोडत प्रक्रियेत OBCवर अन्याय, किशोरी पेडणेकर आक्रमक)

शिंदेंचे समर्थक मनसे-ठाकरे गटातही

गंमत म्हणजे शिंदेंनी फक्त मनसेतच आपले समर्थक पाठवले नाहीत, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतही आपल्या समर्थकांना पाठवत तिकिटं मिळवून दिली. त्यापैकी मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे श्रीकांत शिंदेंचे दोन समर्थक ठाकरे गटातून निवडणूक लढवत निवडून आले. त्यामुळे साहजिकच हे दोन्ही नगरसेवक श्रीकांत शिंदेंकडे गेले. पण या दोघांव्यतिरिक्त ठाकरे गटातले आणखी दोन नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने ठाकरेंकडे केवळ सात नगरसेवक शिल्लक राहिले. परिणामी ठाकरे गटाच्या केडीएमसीच्या नगरसेवकांचा गट स्थापन होऊ शकलेला नाही. 

Advertisement

(नक्की वाचा: Zilla Parishad Election 2026: वडिलांना तिकीट न मिळाल्याने मुलाचा भलताच निषेध, लातूरमध्ये NCP आमदार संजय बनसोडेंच्या कार्यालयाबाहेर केली लघवी)

Advertisement
    उद्धव ठाकरेंनाही शिंदेंनी दाखवला कात्रजचा घाट

    स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी पक्षाकडून निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांच्या दोन तृतीयांश नगरसेवक विभागीय आयुक्तांकडे नोंदणीसाठी गरजेचे आहेत. ठाकरे गटाचे केडीएमसीत एकूण 11 नगरसेवक निवडून आले, त्यामुळे महापालिकेत स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजे किमान आठ नगरसेवक हजर असणं गरजेचं आहे. मात्र ठाकरे गटाचे चार नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने सातच नगरसेवक विभागीय आयुक्तांकडे नोंदणीसाठी उपस्थित होते. त्यामुळे सात नगरसेवकांची नोंदणी झाली पण स्वतंत्र गट स्थापन होऊ शकला नाही. त्यामुळे महापौर निवडणुकीत ठाकरे गटाला व्हिप बजावता येणार नाही. एकूणच काय तर केडीएमसीत शिंदेंनी केलेल्या राजकीय खेळीने दोन्ही ठाकरे हतबल झाल्याचं चित्र आहे.