- भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने कल्याण डोंबिवली महापालिकेत शेवटच्या क्षणाला महायुतीत युती केली
- आरपीआय आठवले गटाला महायुतीत कोणतीही जागा दिली गेली नाही
- आरपीआय आठवले गटाला तीन नगरसेवक पदे आणि परिवहन सदस्य पद देण्याचे आश्वासन देण्यात आले
अमजद खान
भाजप आणि शिवसेना शिंदे गटात शेवटच्या क्षणाला कल्याण डोंबिवली महापालिकेत युती झाली. जागा वाटपाची चर्चा शेवटपर्यंत सुरू होती. म्हणायला ही महायुती आहे. पण त्यात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नाही. शिवाय रामदास आठवलेंची आपीआय ही नाही. अजित पवारांनी तर आपले स्वतंत्र उमेदार दिले आहेत. पण या महायुतीच्या कचाट्यात रिपाईंच मात्र चांगलच मरण झालं आहे. पण आता त्यांनाही लॉटरी लागण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे. ते एक ही जागा लढत नसले तरी त्यांच्या पदरात मोठं काही तरी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटपा दरम्यान आरपीआयला गृहीतच धरलं गेलं नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी एकही जागा सुटली नाही. कल्याण डोंबिवलीच्या काही भागात रिपाईची चांगली ताकद आहे. असं असताना ही एकही जाग न सुटल्याने आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवाय महायुतीच्या उमेदवारांची प्रचार करणार नाही अशी कठोर भूमीका ही घेतली होती. रिपाईच्या या नाराजीची दखल अखेर शिवसेना शिंदे गट आणि भाजपला घ्यावी लागली आहे.
या नाराजीनंतर भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, शिवसेना आमदार राजेश मोरे आणि प्रल्हाद जाधव यांच्या उपस्थितीत एक बैठक
पार पडली. यात जाधव यांची समजूत काढण्यात आली. शिवाय आरपीआय आठवले गटाला न्याय दिला जाईल असे आश्वासन ही देण्यात आले. या बैठकीनंतर रिपाई नेते प्रल्हाद जाधव यांनी सांगितले की शिवसेना भाजप नेत्यांनी मान्य केले आहे की, आम्हाला तीन स्विकृत नगरसेवक देण्यात येणार आहे. शिवाय परिवहन सदस्य पदाची जागा ही दिली जाणार आहे. या आश्वासनामुळे आमचे समाधान झाले आहे असं त्यांनी स्पष्ट केले.
शिवाय आपली नाराजी आता दुर झाल्याचं ही ते म्हणाले. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते महायुतीचे काम करतील असं त्यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण डोंबिवलीच्या अनेक भागात रिपाईची चांगली ताकद आहे. त्याकडे महायुतीच्या नेत्यांना दुर्लक्षीत करून चालणारे नव्हते. त्यामुळे त्यांच्या नाराजीची दखल वेळीच घेतली गेली. त्याचा थेट फायदा महायुतीच्या उमेदवारांना होण्याची दाट शक्यता आहे. मात्र निवडणुकीनंतर रिपाईला दिलेल्या आश्वासनाचे नक्की काय होणार हे ही पाहावे लागणार आहे.