विशाल पुजारी, प्रतिनिधी
Kolhapur News : कृष्णराज महाडिक यांनी मनपा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता, पक्षपातळीवर झालेल्या निर्णयानुसार महापालिका निवडणूक लढवणार नाही, कृष्णराज महाडिक यांनी खुलासा केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कृष्णराज महाडिक हे कोल्हापूर मनपा निवडणुक रिंगणात उतरणार अशा चर्चा होत्या. प्रभाग क्रमांक तीनमधून त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला. मात्र आता त्यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्णराज मनपा निवडणुक लढवणार असं जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियासह, राजकीय वर्तुळात याची चर्चा होती. त्यांच्या उमेदवारी अर्जमुळे काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता कृष्णराज महाडिक यांनी त्यांचा निर्णय दिला आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय झाला असावा असा अंदाजही वर्तवला जात आहे.
निवडणुकीतून माघार घेण्याचा कृष्णराज महाडिक यांचा खुलासा
कृष्णराज महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेणारं असल्याचा निर्णय दिल्यानंतर खुलासा देखील केला आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून, या पक्षातील कार्यकर्ते काम करत असतात. त्यानुसार पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयाचा आदर राखत, मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करत आहे. महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे. अशावेळी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यापैकी आणि कोणालाही निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, या विचारातून मी महापालिका निवडणूक लढवणार नाही. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार, मी निवडणूक लढवण्याचे घोषित केले होते. आता पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार मी निवडणूक लढवणार नाही. तथापि या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर माझ्या नावाचा विचार झाला, ही सुद्धा माझ्यासाठी जमेची आणि समाधानाची बाब आहे. यापुढेही समाजकारणात मी नेहमीच कार्यरत राहीन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, कुटुंबातील सदस्यांचा मी ऋणी आहे.
कृष्णराज महाडिक यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीही त्यांनी माघार घेतली होती. आता देखील मनपा लढवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सोशल मीडियावर या निर्णयची चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
