Latur Election : लातूर महानगरपालिकेवर कोणाची सत्ता? भाजपा की अमित देशमुख? तिसऱ्या एन्ट्रीमुळे चित्र पालटणार?

अजित पवार गटाने अनेक उमेदवार उभे केल्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या मतांमध्ये विभागणी होण्याची दाट शक्यता असून याचा थेट फटका काँग्रेसला बसू शकतो आणि पर्यायाने भाजपला फायदा होऊ शकतो, असा एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Latur Municipal Corporation Election : सध्या राज्यभरातील महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. लातूरमध्येही भाजपचे संभाजीराव पाटील निलंगेकर विरुद्ध काँग्रेसचे अमित देशमुख यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. लातूरमध्ये मुख्यत्वे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यातच खरी लढत होणार असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एन्ट्रीमुळे ही लढत आता तिरंगी होताना दिसत आहे. अजित पवार गटाने अनेक उमेदवार उभे केल्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या मतांमध्ये विभागणी होण्याची दाट शक्यता असून याचा थेट फटका काँग्रेसला बसू शकतो आणि पर्यायाने भाजपला फायदा होऊ शकतो, असा एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

पक्षांची रणनीती आणि प्रचार:

भाजपने आपली रणनीती पूर्णपणे 'कमळ' या चिन्हावर केंद्रित केली आहे. कोणत्याही नेत्याचा मोठा फोटो न वापरता केवळ चिन्हालाच महत्त्व दिले जात आहे. प्रचारात भाजप सध्या तरी आक्रमक वाटत आहे. मात्र, पक्षात अंतर्गत गटबाजी आणि बंडखोरीचे सावट असून अनेक इच्छुकांनी माघार घेतली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर सुरू केला आहे. असे असले तरी, अमित देशमुखांचा कार्यकर्त्यांमधील जनसंपर्क कमी असल्याची तक्रार आहे. काँग्रेसने यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर भर दिला आहे. 

नक्की वाचा - KDMC Election : 7-5-6-2 चा आकडा आणि महायुतीचा थेट धमाका, कल्याण-डोंबिवलीतील 20 जागांवर काय घडलं? वाचा सविस्तर

Advertisement

शहरातील महत्त्वाचे मुद्दे 

  1. पाणी प्रश्न: लातूरचा पाण्याचा प्रश्न अजूनही जसाच्या तसा आहे. आजही शहरात अनेक दिवसांनी पाणी येते आणि जुन्या पाईपलाईनमुळे वेळापत्रक कोलमडलेले असते.
  2. खाजगीकरण आणि कर: महानगरपालिकेने मालमत्ता करात केलेली मोठी वाढ हा चर्चेचा विषय आहे. तसेच शहरातील उद्याने आणि सफाई कामांचे होत असलेले खाजगीकरण यावरूनही नाराजी व्यक्त होत आहे.
  3. कायदा आणि सुव्यवस्था: शहरात गुन्हेगारीच्या घटना आणि वाहतूक कोंडी वाढल्याचा मुद्दा पत्रकारांनी अधोरेखित केला आहे.

जातीय समीकरणे...

लातूरच्या राजकारणात आजही जातीय समीकरणे महत्त्वाची ठरतात. लिंगायत समाजाची भूमिका भाजपसाठी महत्त्वाची मानली जाते, तर इतर लहान जातींच्या प्रतिनिधित्वाबाबत उदासीनता असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. सध्याच्या घडीला भाजपचा प्रचार आणि नियोजन पाहता त्यांचे पारडे थोडे जड वाटत असले, तरी भाजपमधील अंतर्गत बंडखोरी आणि काँग्रेसचा सोशल मीडियावरील दणका यामुळे ही निवडणूक अटीतटीची होईल. राष्ट्रवादी काँग्रेस किती मते खाणार, यावरच विजयाचे गणित अवलंबून असेल.