Dharashiv Lok Sabha 2024 : दीर - भावजयीच्या लढतीत धाराशिवचा खासदार कोण होणार?

Dharashiv Lok Sabha 2024 : माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या धाराशिव जिल्ह्याचं राजकारण पाटील घराण्यातील वादाभोवती फिरतंय.

Advertisement
Read Time: 3 mins
Omraje Nimbalkar vs Archana patil : धाराशिवचा खासदार कोण होणार?
धाराशिव:

माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचा एकेकाळी बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या धाराशिव जिल्ह्याचं राजकारण पाटील घराण्यातील वादाभोवती फिरतंय. यंदाची धाराशिव लोकसभा निवडणूक देखील त्याला अपवाद नव्हती. धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचा त्यांच्या भावजय अर्चना पाटील यांच्याशी थेट सामना झाला. धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 31 उमेदवार असले तरी खरी लढत दीर विरुद्ध भावजय यांच्यात होती.

मतदासंघाचा इतिहास

राज्यातील अन्य मतदारसंघाप्रमाणेच धाराशिव हा देखील एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरचे आणि मौनी खासदार म्हणून प्रसिद्ध असलेले अरविंद कांबळे या मतदारसंघातून सलग 4 वेळा विजयी झाले होते. 1996 साली शिवसेनेच्या शिवाजी कांबळे यांनी काँग्रेसच्या विजयाची मालिका खंडित केली. 1998 साली पुन्हा अरविंद कांबळे विजयी झाले. पण, त्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रवादीच्या स्थानपनेनंतर काँग्रेसला जिल्ह्यात अस्तित्वासाठी लढावं लागतंय.

2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ खुला झाला. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पद्मसिंह पाटील यांनी शिवसेनेच्या रवींद्र गायकवाडवर 6,787 मतांनी निसटता विजय मिळवला होता. 2014 साली मोदी लाटेत गायकवाड यांनी या पराभवाची परतफेड केली. 2019 साली शिवसेनेनं गायकवाड यांचं तिकीट कापलं. ओमराजे निंबाळकरांनी पक्षाची ही जागा राखली. शिवसेनेतील फुटीनंतरही ओमराजे उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले. त्यांना यंदा पुन्हा एकदा ठाकरे गटानं उमेदवारी दिलीय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भाजपाचा दावा आणि...

धाराशिव लोकसभा मतदारसंघ भाजपा लढवणार अशी चर्चा होती. बसवराज पाटील आणि माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची नावं चर्चेत होती. ऐनवेळी भाजपा आमदार राणा जगतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिकीट मिळवलं. त्यामुळे या निवडणुकीत दीर विरुद्ध भावजय लढत झाली.

Advertisement

धाराशिव मतदारसंघाततील सहापैकी पाच (औसा, उमरगा, तुळजापूर, परंडा आणि बार्शी) या पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. तर धाराशिवची एकमेव जागा महाविकास आघाडीकडं आहे. 

( नक्की वाचा : लातूरकरांच्या मतदानाचा पॅटर्न काय? श्रृंगारे की काळगे कुणाला मिळणार संधी? )
 

प्रचाराचा धुराळा आणि मुद्दे

धाराशिव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांचा अर्ज भरताना अजित पवार यांनी स्वत: उपस्थित राहत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील मतदारसंघात प्रचारांचा धडाका लावला होता. भूम-परंडा भागात अर्चना पाटील यांना आघाडी मिळवून देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती.

Advertisement

महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी प्रचारसभा घेत धाराशिवकरांना भावनिक आवाहन केलंय. तर शरद पवारांनी तुळजापूरमध्ये सभा घेत ओमराजेंना विजयी करण्याचं आवाहन केलं. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांनीही सभा घेतली.

( नक्की वाचा : दक्षिण मध्य मुंबईत मतदानाचा घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर? )
 

धाराशिव लोकसभा मतदारसंघ दिग्गज नेत्यांनी प्रचारासाठी ढवळून काढला असला तरी येथील प्रश्न वर्षानुवर्ष कायम आहेत. सततचा दुष्काळ, उद्योगांचा अभाव, रोजगाराच्या अपुऱ्या संधी, मतदारसंघातील राजकारण यामुळे धाराशिव आजही राज्यातील मागास जिल्हा आहे. 

Advertisement

महिला वर्गातील प्रतिमा, महायुतीच्या आमदारांची रसद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा यावर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांची भिस्त होती. तर गेल्या पाच वर्षातील काम, वैयक्तिक संपर्क आणि महाविकास आघाडीचे पारंपरिक मतदार यावर ओमराजेंची मदार होती.  ओमराजे पुन्हा विजय मिळवणार की अर्चना पाटील खासदार होणार हे 4 जूनला स्पष्ट होईल.