जाहिरात
Story ProgressBack

ठाकरेंची प्रतिष्ठा तर राणेचं राजकीय भवितव्य पणाला, कोकणी माणसाची साथ कुणाला?

त्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गेली 2 टर्म शिवसेनेचे विनायक राऊत खासदार आहेत. शिवसेना फुटल्यानंतरही विनायक राऊत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. उद्धव ठाकरे यांचे ते निष्ठावान मानले जातात.

Read Time: 5 min
ठाकरेंची प्रतिष्ठा तर राणेचं राजकीय भवितव्य पणाला, कोकणी माणसाची साथ कुणाला?

कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात एकूण 9 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत ही महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यामध्येच आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आजही कोकणात शिवसेनेचं वर्चस्व कायम आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गेली 2 टर्म शिवसेनेचे विनायक राऊत खासदार आहेत. शिवसेना फुटल्यानंतरही विनायक राऊत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. उद्धव ठाकरे यांचे ते निष्ठावान मानले जातात. यावेळी तिसऱ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे नारायण राणे हे महायुतीचे उमेदवार आहेत. नारायण राणे यांना भाजपमध्ये आल्यानंतर राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. त्यांनतर आता भाजपने त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे.

महायुतीत उमेदवारीवरून होती रस्सीखेच

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्याच्या आगोदरपासूनच महायुतीमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच होती. शिवसेनेकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत इच्छूक होते. शिवसेनेचाच या मतदारसंघावर हक्क असल्याचं शिवसेनेचे नेते वारंवार सांगत होते. तर भाजपने देखील सुरुवातीपासून या मतदारसंघात दावा केलेला होता. अगदी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधीपर्यंत महायुतीत हा घोळ सुरू होता. अखेर अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी ही जागा भाजपला सुटली आणि नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सामंत बंधू यांनी देखील नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असं सांगत नारायण राणेंच्या प्रचारात खांद्याला खांदा लावून काम केलं.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एकूण नऊ उमेदवार रिंगणात

  • आयरे राजेंद्र लहू (बहुजन समाज पार्टी), चिन्ह- हत्ती 
  • नारायण तातू राणे (भारतीय जनता पार्टी), चिन्ह - कमळ 
  • विनायक भाऊराव राऊत (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), चिन्ह- मशाल 
  • अशोक गंगाराम पवार (बहुजन मुक्ती पार्टी), चिन्ह - खाट 
  • मारुती रामचंद्र जोशी (वंचित बहुजन आघाडी), चिन्ह - प्रेशर कुकर 
  • सुरेश गोविंदराव शिंदे (सैनिक समाज पार्टी), चिन्ह - शिट्टी 
  • तांबडे अमृत अनंत (अपक्ष), चिन्ह- पेनाची निब सात किरणांसह 
  • विनायक लवु राऊत (अपक्ष), चिन्ह- चिमणी 
  • शकील सावंत (अपक्ष), चिन्ह- माईक
  • प्रचार कोणी गाजवला?

    महायुतीकडून नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजपा नेते , केंद्रीय मंत्री भाजपचे स्टार प्रचारक अमित शहा मैदानात उतरले होते. रत्नागिरीत त्यांची जाहीर सभा झाली होती. तर राजापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती. तर राज ठाकरे यांनी देखील राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत सभा घेतली. त्याचबरोबर राणेंबरोबर भाजपा नेते रवींद्र चव्हाण स्वतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग तळ ठोकून होते. तर उद्योगमंत्री उदय सामंत, किरण सामंत, मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, बाळ माने अशी फौज राणेंसोबत प्रचारात होती. तसेच जिल्हा परिषद गट निहाय आणि शहराच्या प्रत्येक प्रभागात, तसेच घरोघरी जाण्यावर प्रचाराचा भर होता.

    ( नक्की वाचा : सातारा लोकसभा निवडणूक : पवारांवरील निष्ठा की राजेंचा मान? चुरशीच्या लढतीकडं राज्याचं लक्ष )

    ठाकरेंच्या शिवसेनेने लावली ताकद पणाला

    तर विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यात सभा घेतल्या. आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, युवा नेते वरुण सरदेसाई हे देखील विनायक राऊत यांच्यासाठी मैदानात होते. जिल्हा परिषद गट निहाय तसेच खळा बैठकांवर भर देण्यात आला.

    महायुतीच्या प्रचारात कोणते मुद्दे ?

    370 कलम, राम, मंदिर, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका, असली नकली शिवसेना, विद्यमान खासदारांनी काहीच केलं नसल्याची टीका, विद्यमान खासदारांनी विकासाच्या दृष्टीने काय केलं? यावर भर देण्यात आला. तर कोकणात मोठे प्रकल्प आणू, रोजगाराच्या संधी निर्माण करू अशी आश्वासने देण्यात आली.

    महाविकास आघाडीच्या प्रचारातील मुद्दे

    शिवसेना फोडली, गद्दार गट, भाजप संविधान बदलणार, हिंदू-मुस्लीम फूट पाडली जातेय, सिडकोचा ब्राह्मराक्षस आणून कोकण खासगी विकासकांना आंदन दिलं जाणार, नारायण राणेंवर टीका, राणेंनी दहशतवाद माजवला, विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही. 

    2019 च्या निकालाची आकडेवारी

    गेल्या वेळी म्हणजेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. पण शिवसेनेचे विनायक राऊत तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे अशीच लढत पाहायला मिळाली. तर काँग्रेस उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले. गेल्या वेळी विनायक राऊत यांना 458022 मतं मिळाली, तर निलेश राणे यांना 279700 मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या नविनचंद्र बांदिवडेकर यांना 63219 मतं मिळाली होती. 

    ( नक्की वाचा : रायगड कोण सर करणार? गिते-तटकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई )

    पक्षीय बलाबल कशी आहे ?

    शिवसेना फुटल्यानंतर या लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या 4 पैकी 2 आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. तर दोन आमदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, सावंतवाडीचे दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आहेत, तर राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळाचे वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. तर लोकसभा मतदारसंघात कणकवली-देवगडचे भाजपचे नितेश राणे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे चिपळूणचे आमदार शेखर निकम असे अन्य दोन आमदार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे आमदारकीचे बलाबल पाहिल्यास महायुतीकडे 4 आमदार तर महाविकास आघाडीकडे 2 आमदार आहेत. आमदारकीचे बलाबल पाहिल्यास कागदावर तरी महायुतीची ताकद जास्त आहे. 

    मतदारसंघाचा इतिहास

    2009 मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यापूर्वी राजापूर-सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असे दोन मतदारसंघ होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात काँग्रेस आणि प्रजा समाजवादी पक्षाचा राजापूर मतदारसंघात प्रभाव होता. तर रत्नागिरीत काँग्रेस, प्रजा समाजवादी पक्ष आणि जनता पक्षाचा दबदबा होता. 1996 पासून मात्र जुन्या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेनेच बाजी मारली. अनंत गीते सलग सहा वेळा या ठिकाणी निवडून आले. जुन्या मतदारसंघातून चार वेळा आणि मतदारसंघ फेररचना झाल्यानंतर ते दोन वेळा निवडून आले.

    जुन्या राजापूर-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात बॅरिस्टर पै नाथ बापू हे प्रजा समाजवादी पक्षाकडून तीन वेळा विजयी झाले होते. तर मधू दंडवते यांनी पाच वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. दंडवते यांनी एकदा प्रजा समाजवादी पक्ष आणि भारतीय लोकदल यांच्याकडून प्रत्येकी एकदा, तर जनता पक्षाच्या तिकिटावर तीन वेळा, असे 5 वेळा ते जुन्या राजापूर मतदारसंघातून लोकसभेवर गेले. 1991 मध्ये काँग्रेसचे सुधीर सावंत विजयी झाले होते. त्यानंतर मात्र शिवसेनेचा प्रभाव कोकणात वाढू लागला. 1996 पासून झालेल्या निवडणुकांमध्ये सलग चार वेळा शिवसेनेच्या तिकिटावर सुरेश प्रभू लोकसभेत पोहचले. 2009 मध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली होती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. 

    2009 मध्ये मात्र तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या निलेश राणे यांनी सुरेश प्रभू यांचा पराभव केला. पण 2014 मध्ये आणि 2019 मध्ये शिवसेनेने इथे पुन्हा आपला झेंडा फडकवला. विनायक राऊत सलग दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले. आता तिसऱ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या समोर नारायण राणे यांचे आव्हान आहे. भाजपने पूर्ण ताकद या मतदारसंघात लावली आहे. त्यामुळे आता राणे शिवसेनेचा गड भेदतात का ? याकडे कोकणवासियांचं लक्ष लागलं आहे.

    डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
    Our Offerings: NDTV
    • मध्य प्रदेश
    • राजस्थान
    • इंडिया
    • मराठी
    • 24X7
    Choose Your Destination