सुप्रिया सुळेंना दुहेरी धक्का; बारातमीतून शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात, तर अपक्ष उमेदवाराला 'तुतारी' चिन्ह

बारामती लोकसभेसाठी सोहेल शेख नावाच्या उमेदवाराला तुतारी चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचंच नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. कारण पवार कुटुंबीय या निवडणुकीत आमने-सामने आहेत. एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शरद पवार यांच्यासाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. मात्र सुप्रिया सुळे यांच्यासमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे. एका उमेदवाराला तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं आहेत. तर शरद पवार नावाच्या उमेदवाराने देखील येथून अर्ज दाखल केला आहे.

(नक्की वाचा - माघार नाहीच! सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष उमेदवार; चिन्हही ठरलं!)

बारामती लोकसभेसाठी सोहेल शेख नावाच्या उमेदवाराला तुतारी चिन्ह निवडणूक आयोगाने दिलं आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण शरद पवार गटाचं चिन्ह देखील तुतारी फुंकणारा माणूस आहे. मात्र पक्षाकडून तुतारी असाच प्रचार केला जात आहे. त्यामुळे सोहेल शेख यांना दिलेल्या तुतारी चिन्हावर सुप्रिया सुळे यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे. सोहेल शेख मुळचे बीडचे आहेत. मात्र लोकसभेच्या निवडणुकीचा बारामतीमधून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

सुप्रिया सुळेंची हरकत

सुप्रिया सुळे यांनी यांच्यावतीने लक्ष्मीकांत खाबिया यांनी हरकत घेतली आहे. अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह वाटप करण्यात आलं आहे. यावर आमचा आक्षेप आहे. तुतारी फुंकणारा माणूस आणि तुतारी या दोन्ही चिन्हांच्या नावामध्ये साधर्म्य आहे. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुतारी नावात बदल करुन निवडणूक आयोगाने वेगळा शब्द देण्याची विनंती करण्यात आली आहे. 

वाचा - Exclusive : अजित पवारांना कुटुंबाने एकटे पाडले, धनंजय मुंडे यांचा आरोप

शरद पवार यांनीही भरला अर्ज

बारामतीतून शरद पवार नावाच्या उमेदवाराने देखील निवडणुकीचा अर्ज भरला आहे. या उमेदवारला जेवणाचे ताट हे चिन्ह देण्यात आले आहे. पुण्यातील बघतोय रिक्षावाला संघटनेकडून खासदारकीसाठी शरद पवार यांचा उमेदवाराचा अर्ज भरला आहे. आम्ही डमी उमेदवार नाही. नाहीतर फ्री सिम्बॉल पैकी एक तुतारी हे सुद्धा होत, आम्ही ते मागू शकलो असतो.  पण आम्हाला फसवणूक करून नाहीतर सत्यावर प्रामाणिकपणे मतदान हवंय, असं शरद पवार यांनी म्हटलंय. 

Advertisement