लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election Result 2024) निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. 543 पैकी 542 जागांवर मतमोजणी झाली. यामध्ये भाजपाच्या नेतृत्त्वाखालील NDA ला स्पष्ट बहुमत मिळालंय. पण, भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलं. NDA चं देशात तिसऱ्यांदा सरकार होणार हे स्पष्ट आहे, असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं. ही देशवासीयांचा आभारी आहे. हा विकसित भारताचा विजय आहे, असं मोदींनी यावेळी सांगितलं.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय
पंतप्रधान मोदींनी सांगितलं, 'आजचा विजय देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय आहे. भारताचा राज्यघटनेवरील निष्ठेचा विजय आहे. विकसित भारताच्या संकल्पनेचा विजय आहे. हा सबका साथ-सबका विकास या मंत्राचा विजय आहे. हा 140 कोटी भारतीयांचा विजय आहे.'
( नक्की वाचा : सर्वाधिक जागा देणाऱ्या 2 मोठ्या राज्यात भाजपाला फटका का बसला? )
ओडिशामध्ये भाजपाचा पहिल्यांदा मुख्यमंत्री
मोदींनी यावेळी सांगितलं, 'विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठा विजय मिळाला आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशात काँग्रेसचा सूपडा साफ झालाय. अनेकांना तर डिपॉझिट वाचवणं अवघड झालं. लोकसभा निवडणुकीत ओडिशामध्येही भाजपानं दमदार कामगिरी केलीय. पहिल्यांदाच महाप्रभू जग्गनाथ यांच्या भूमीत भाजपाचा मुख्यमंत्री होणार आहे. भाजपानं केरळमध्येही विजय मिळवलाय. केरळमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी हौतात्म्य दिलंय. ते संघर्ष करत होते. सामान्य नागरिकांची सेवा करत होतो. तेलंगणामध्येही आमच्या जागा वाढल्या आहेत.'
( Winning Candidate List : राज्यातील सर्व 48 विजयी उमेदवारांची नावे )
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान
भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील मतदार आणि भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले. 'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली 2014 आणि 2019 मध्ये मजबूत सरकार आलं. 2024 मध्येही मतदारांनी नरेंद्र मोदी यांना आशीर्वाद दिला आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. देशात पहिल्यांदाच आघाडी सरकार सलग तिसऱ्यांदा सरकार बनवत आहे, असं नड्डा यांनी यावेळी सांगितलं.