Lok Sabha Result : पंतप्रधान मोदी की राहुल गांधी, देशाची गॅरेंटी कुणाला? उद्या होणार फैसला

मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दुपारी तीनवाजेपर्यंत पूर्ण होईल, असं नियोजन करण्यात आलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक सातव्या टप्प्यात पार पडली असून येत्या काही तासात याचा निकाल समोर येणार आहे. 4 जून, मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक पार पडली असून मंगळवारी 48 लोकसभा मतदारसंघांचे निकाल जाहीर होणार आहेत. ही देशाची 18 वी लोकसभा आहे. देशात लोकसभेच्या एकूण 543 जागा आहे. त्यासाठी ही निवडणूक पार पडली. 

महाराष्ट्रात कशी असेल तयारी?
राज्यातील 48 मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एकूण 259 हॉलमध्ये 4,309 मतमोजणी टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. 

नक्की वाचा - अद्यापही आदिवासी दुर्लक्षित जिल्हा, गडचिरोलीत होणार का 'तख्ता पलट'?

मुंबईची मतमोजणी तीनवाजेपर्यंत पूर्ण
मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दुपारी तीनवाजेपर्यंत पूर्ण होईल, असं नियोजन करण्यात आलं आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिवडीतील वेअर हाऊस येथे होणार आहे. तर उत्तर मुंबई, वायव्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या तीन मतदारसंघाची मतमोजणी नेस्को सेंटर, गोरेगाव येथे होईल. तर ईशान्य मुंबई मतदारसंघाची मतमोजणी उदयांचल शाळा, विक्रोळी येथे होईल. 

सुरुवातीला टपाली मतमोजणी केली जाईल, त्यानंतर ईव्हीएमद्वारे मतमोजणी करण्यात येईल. ही मजमोजणी विधानसभा मतदारसंघ केली जाते. सर्वसाधारणपणे मतमोजणी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रानुसार 18 ते 21 फेऱ्यात होतील. सकाळी 11 वाजेपर्यंत कल तर दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल.   

Advertisement